मिरजेत शंभर फुट तिरंगा ध्वज उभारणार, महापालिका स्थायी सभेची मान्यता
By शीतल पाटील | Published: August 26, 2022 07:24 PM2022-08-26T19:24:26+5:302022-08-26T19:25:21+5:30
सांगली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्त मिरजेतील महात्मा गांधी चौकात महापालिकेच्यावतीने शंभर फुट उंचीचा विद्युत रोषणाईने उजळणारा तिरंगा ध्वज ...
सांगली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्त मिरजेतील महात्मा गांधी चौकात महापालिकेच्यावतीने शंभर फुट उंचीचा विद्युत रोषणाईने उजळणारा तिरंगा ध्वज उभारण्यात येणार असल्याचे स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी सांगितले. स्थायी समितीच्या सभेत याला मान्यता देण्यात आली.
सभापती आवटी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. आवटी म्हणाले, पुण्याच्या एका खासगी कंपनीला तिरंगा उभारण्याचे काम देण्यात आले आहे. देशाचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे, देशाचा अभिमान सदैव फडकत रहावा या हेतूने शंभर फुटी तिरंगा ध्वज मिरजेतील गांधी चौकात फडकवत ठेवला जाणार आहे.
फ्लॅग कोड ऑफ इंडियाच्या नियमांनुसार ध्वज उभारण्यात येणार असून त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाची परवानगी घेण्यात येईल. स्तंभावर फडकवण्यात येणाऱ्या तिरंगा ध्वजाची साईज २० फूट बाय ३० फूट आहे. रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्थेसाठी विशिष्ट प्रकारच्या लेन्स असलेल्या एलईडी फिटिंग व्यवस्था केली आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय केली जाणार आहे. तिरंगा ध्वज चढविणे व उतरविण्यासाठी मोटोराईजड व मॅन्युअल मेकॅनिझमची सुविधा आहे. ध्वजस्तंभ उभारणीसाठी करण्यात येणारे फाउंडेशन हे प्रत्यक्ष साईटवरील माती परीक्षणानुसार केले जाईल, असेही आवटी यांनी सांगितले.