gram panchayat election: मतदानासाठी सांगलीतील तरुणाचा १४० किलोमीटरचा सायकल प्रवास, दिला खास संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 04:29 PM2022-12-19T16:29:13+5:302022-12-19T16:30:08+5:30
मतदानाचा दिवस म्हणजे मिळालेली सुटी असं समजून भटकंतीचे नियोजन करणाऱ्यांना चपराक
सांगली : मतदानाचा दिवस म्हणजे मिळालेली सुटी असं समजून भटकंतीचे नियोजन करणाऱ्यांना एका सजग तरुणाने मतदानासाठीसांगली-विटा-सांगली असा १४० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करीत चपराक दिली आहे. ‘स्वतःच्या उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा तसेच लोकशाहीच्या उत्तम आरोग्यासाठी मतदान करा’ असा संदेश यानिमित्ताने दिला.
सांगलीतील आर. जोशीज् बॅडमिंटन अकॅडमीचे प्रमुख ऋषीन जोशी यांचे मूळ गाव खानापूर तालुक्यातील घानवड. अकॅडमीच्या निमित्ताने गेल्या सहा-सात वर्षांपासून ते सांगलीतच वास्तव्यास आहेत. असे असले तरी गावाशी असलेली नाळ त्यांनी जपली आहे. सांगलीत राहत असले तरी त्यांचे मतदान घानवड येथेच आहे.
आरोग्याबाबत सजग असणारे जोशी एक जबाबदार नागरिक म्हणून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी कोणत्याही निवडणुकीसाठी गावी मतदानाला जातातच. आताच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही रविवारी ते मतदान करण्यासाठी जाणार होते. पण यादरम्यान थोडा वेगळा विचार करत त्यांनी थेट सायकलवरून मतदानासाठी जाण्याचा निर्णय घेतला.
‘व्यायाम करा.. स्वतःला बळकट करा, मतदान करा... लोकशाही बळकट करा’. हा संदेश घेऊन त्यांनी सांगली-विटा-सांगली असा १४० किलोमीटरचा प्रवास सायकलने केला. सकाळीच ते सायकल घेऊन सांगलीतुन घानवडच्या दिशेने रवाना झाले. मतदानासाठी थेट सायकलवरुन गावात आलेल्या ऋषीन जोशी यांचे ग्रामस्थांनीही स्वागत केले. या उपक्रमाद्वारे जोशी यांनी आजच्या तरुण पिढीसमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.