Sangli Crime: बँक कर्मचाऱ्याने नऊ ग्राहकांना घातला ९० लाखांचा गंडा, मिरजेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 11:47 AM2023-02-27T11:47:43+5:302023-02-27T11:56:07+5:30
संतप्त ग्राहक व बँक अधिकाऱ्यांचे वादावादीचे प्रकार
मिरज : मिरजेतील ॲक्सिस बँकेत ग्राहकांचे पैसे इतर खात्यांवर वळवून बँकेतील नऊ ग्राहकांना सुमारे ९० लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकणी तोहिद बशीर शरिकमसलत (वय २७, रा. मिरज) या बँक कर्मचाऱ्यावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोहिद याने ९० लाख ६१ हजारांची फसवणूक केल्याची तक्रार बँक व्यवस्थापक साजिद पटेल यांनी पोलिसात दिली आहे.
ॲक्सिस बँकेत नवीन ग्राहकांचे खाते उघडण्याचे काम करणाऱ्या तोहिद शरीकमसलत याने खातेदारांशी चांगली ओळख करत म्युच्युअल फंडसह बँकेच्या विविध योजनांत पैसे गुंतविण्यास सांगितले. त्याला नोकरीत बढती मिळण्यासाठी ठेवीची गरज असून, काही कालावधीसाठी बँकेत ठेवी ठेवा, असे सांगून त्याने अनेक ग्राहकांना गळ घातली. काही खातेदारांच्या बँक खात्यांचा मोबाइल क्रमांकही परस्पर बदलला. तोहिद शरिकमसलत याने इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून खातेदारांच्या खात्यावरील रक्कम आपल्या मित्रांच्या चार वेगवेगळ्या खात्यांवर वर्ग करून परस्पर काढून घेतली.
याबाबत खातेदारांनी रकमेसाठी तगादा सुरू केल्यानंतर तोहिद याने मिरजेतून पलायन केले. त्यामुळे संतप्त ग्राहक व बँक अधिकाऱ्यांचे वादावादीचे प्रकार घडले. बँक ग्राहक अमिना नजीर अहमद शेख यांच्या खात्यावरील ६ लाख रुपये, गणी गोदाड यांचे १२ लाख, हुसेन बेपारी यांचे २३ लाख, शिराज कोतवाल यांचे २३ लाख, वाहिद शरीकमसलत यांचे ११ लाख, मेहेबूब मुलाणी यांचे २ लाख, रमेश सेवानी यांचे १६ लाख व अनिल पाटील यांचे २ लाख अशा नऊ खातेदारांच्या खात्यावरील ९० लाखांची रक्कम परस्पर काढून फसवणूक केल्याची तक्रार आहे. बँक व्यवस्थापनाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तोहिद शरिकमसलत याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.