Sangli News: जनावरांच्या आठवडी बाजाराबाबत प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
By अशोक डोंबाळे | Published: January 6, 2023 06:47 PM2023-01-06T18:47:28+5:302023-01-06T18:48:06+5:30
लम्पी त्वचारोगाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या आठवडी बाजारावर होती बंदी
सांगली : लम्पी त्वचारोगाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या आठवडी बाजारावर बंदी होती. लसीकरणासह अन्य अटींचे पालन करण्याच्या हमीवर शेळ्या-मेंढ्या, म्हैसवर्गीय जनावरांच्या यात्रा, आठवडा बाजारावरील निर्बंध हटविण्यात आले आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
जितेंद्र डुडी म्हणाले, जिल्ह्यांतर्गत वाहतूक करावयाच्या गुरांचे लम्पी चर्मरोगाकरिता २८ दिवसांपूर्वी प्रतिबंधक लसीकरण झालेले असणे गरजेचे आहे. वाहतूक करावयाच्या गुरांची आणि म्हशींची ओळख पटविण्यासाठी कानात टॅग नंबर असणे, इनाफ पोर्टलवर नोंदणी असणे आवश्यक आहे. वाहतूक करताना विहित प्रपत्रामधील आरोग्य दाखला आणि स्वास्थ्य प्रमाणपत्र वाहनचालकाकडे असले पाहिजे. म्हशीचा आठवडी बाजार भरण्यापूर्वी व नंतर संपूर्ण परिसरात जंतूनाशक व कीटकनाशक औषधाची फवारणी आयोजकांनी करणे बंधनकारक आहे.
आठवडी बाजार परिसरात फक्त कानात टॅग मारलेल्या म्हैसवर्गातील जनावरांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. जनावरांची यादी संबंधित पशुपालकांच्या नावासहीत (टॅग नंबरसह) पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती यांना त्याच दिवशी देणे बंधकारक आहे. तसेच संक्रमित असलेल्या व नसलेल्या क्षेत्रातून गुरांची, म्हशींची वाहतूक करण्यासाठी आवश्यक ते आरोग्य प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी गट-अ पेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून प्राधिकृत केले आहे.
गायवर्गीय जनावरांना बाजारात बंदी
गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात जनावरांच्या आठवडा बाजारावर निर्बंध होते. तीन महिन्यांनंतर जनावरांच्या आठवडा बाजारावरील निर्बंध उठविले आहेत, पण गायवर्गीय जनावरांच्या आठवडा बाजारावर निर्बंध कायम असणार आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी दिली.