आले पिकाच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची डोकदुखी वाढली, कंदकुजमुळे उत्पादनही घटले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 12:45 PM2024-11-30T12:45:51+5:302024-11-30T12:46:23+5:30
विक्रीसाठी व्यापाऱ्यांना साकडे
प्रताप महाडिक
कडेगाव : कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आता आर्थिक संकट उभे ठाकले आहे. आले पिकाच्या दरात मोठी घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठीदेखील संघर्ष करावा लागतो आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यात आले उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असताना मागील महिन्यापासून आल्याच्या दरात सुरू झालेली घसरण शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे.
सध्या आले पिकास प्रतिगाडी (५०० किलो) १२ ते १५ हजार रुपये दर मिळत आहे, जो मागील महिन्याच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे. मागील दोन वर्षांमध्ये आले उत्पादक शेतकऱ्यांना १०० ते १२५ रुपये किलो दर मिळत होता. त्यामुळे आले लागवड योजना मोठ्या प्रमाणावर वाढली. यावर्षी दमदार पाऊस झाल्यामुळे शेतात पाणी साचल्याने कंदकुज सुरू झाली.
यामुळे एकूण लागवडीच्या ३० ते ३५ टक्के आले पिकाचे क्षेत्र बाधित झाले. शेतकऱ्यांनी आले टिकवण्यासाठी औषध फवारणीसह सर्व प्रयत्न केले. यामुळे त्यांचा खर्चही वाढला आहे. दरातील घट आणि कंदकुजमुळे शेतकऱ्यांना आले लवकर काढावे लागत आहे.
व्यापारी कमी दरात आले विकत घेत आहेत. काही व्यापाऱ्यांनी तर खरेदी बंद केली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन आले खरेदी करणारे स्थानिक व्यापारी आवक वाढल्याने दर कमी झाल्याचे शेतकऱ्यांना सांगत आहेत. मात्र, हा आले दर कमी करण्यासाठीचा नियोजनबद्ध कार्यक्रम असल्याची शेतकरी वर्गात चर्चा आहे. दर घसरल्याने शेतकरी मात्र कर्जाच्या ओझ्याखाली दबले जात आहेत.
कंदकुज आणि उत्पादन घट
शेतकरी कंदकुज सुरू झालेले आले पीक जास्त दिवस जमिनीत ठेवू शकत नाहीत. त्यामुळे कंदकुजपासून वाचलेला चांगला माल काढून मिळेल त्या दरात विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. शेतकऱ्यांची ही व्यथा आहे.
कृत्रिम दर घट
आले पिकाच्या दरात झालेली घट ही कृत्रिम असल्याची शंका शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी बंद केली आहे आणि काही व्यापाऱ्यांकडून दर कमी करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबविला जात असल्याची शेतकऱ्यांत चर्चा आहे.