सांगलीत क्रूरतेचा कळस; पाठीत अडकलेल्या कुऱ्हाडीसह रक्तबंबाळ वळू गावभर फिरला

By संतोष भिसे | Published: July 16, 2024 06:16 PM2024-07-16T18:16:42+5:302024-07-16T18:17:35+5:30

बेशुद्ध करुन कुऱ्हाड काढली

A bloody bull with an ax stuck in its back roamed in sangli | सांगलीत क्रूरतेचा कळस; पाठीत अडकलेल्या कुऱ्हाडीसह रक्तबंबाळ वळू गावभर फिरला

सांगलीत क्रूरतेचा कळस; पाठीत अडकलेल्या कुऱ्हाडीसह रक्तबंबाळ वळू गावभर फिरला

सांगली : माधवनगर परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून फिरणाऱ्या एका वळूवर कोणीतही कुऱ्हाडीचे वार केले. घाव बसताच वळू उधळला. पण वार खोलवर झाल्याने कुऱ्हाड त्याच्या शेपटीजवळ पाठीतच रुतून बसली. अडकलेली कुऱ्हाड आणि सांडणारे रक्त यासह तो गावभर फिरत होता. अखेर प्राणीप्रेमींनी त्याला बेशुद्ध करुन कुऱ्हाड काढली.

मंगळवारी सकाळी ही घटना घडली. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या क्रुर हल्ल्याचा प्राणीप्रेमींनी निषेध केला. संबंधितावर कारवाईसाठी संजयनगर पोलिस ठाणे गाठले. माधवनगर परिसरात हा वळू जखमी अवस्थेत फिरत असल्याची माहिती नागरिकांनी प्राणीमित्रांना दिली. बराच रक्तस्त्राव झाल्याने तो अशक्त झाला होता. ॲनिमल रेस्क्यू पथक आणि ॲनिमल राहतच्या सदस्यांनी त्याच्यावर उपचारासाठी पावले उचलली. कुऱ्हाड खोलवर जाऊन अडकल्याने ती काढणे मुश्किल होते. त्यासाठी वळूला बेशुद्ध करणे गरजेचे होते. ॲनिमल राहतच्या पशुवैद्यांनी त्याला भूल दिली. तो बेशुद्ध झाल्यानंतर कुऱ्हाड बाहेर काढली.

कुऱ्हाड काढत असतानाही बराच रक्तस्त्राव होत होता, तो वेळीच थांबविल्याने वळूचे प्राण वाचू शकले. पोलिसांच्या सूचनेनुसार पुढील उपचारासाठी सुरक्षितस्थळी ठेवण्यात आले आहे. हल्लेखोरावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी प्राणीमित्रांनी पोलिसांकडे केली.

Web Title: A bloody bull with an ax stuck in its back roamed in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली