पुस्तकांचे रुखवत, विज्ञानवादी विचारांचा जागर; सांगलीत पार पडला सत्यशोधक विवाह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 05:39 PM2023-05-11T17:39:32+5:302023-05-11T17:39:45+5:30
सांगली : अन्न-धान्याची नासाडी टाळण्यासाठी तांदळांऐवजी फुलांच्या अक्षता, किमती भेटवस्तूंऐवजी प्रगतीशील विचारांच्या पुस्तकांचे रुखवत सजवून, विज्ञानवादी विचारांचा जागर अन् ...
सांगली : अन्न-धान्याची नासाडी टाळण्यासाठी तांदळांऐवजी फुलांच्या अक्षता, किमती भेटवस्तूंऐवजी प्रगतीशील विचारांच्या पुस्तकांचे रुखवत सजवून, विज्ञानवादी विचारांचा जागर अन् प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करीत सांगलीत सत्यशोधक विवाह पार पडला.
बिसूर येथील सुभाष सदाशिव पाटील यांची कन्या संपदा व मिरज तालुक्यातील करोली (एम) येथील अभियंता अतुल काकासाहेब पाटील यांचे पुत्र अभिनव यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह झाला. संविधान सोबत घेऊन वधू-वरांचे आगमन झाले. घटनेतील प्रास्ताविकेचे वाचन, स्वातंत्र्य आणि समानतेच्या वागणुकीची शपथ घेत दोघांनी एकमेकांना जीवनसाथी म्हणून स्वीकारले.
तुताऱ्यांच्या निनादात वधू-वरांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले. आंब्याच्या रोपाला पाणी घालून वृक्षारोपणाचा संदेश दिला. डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी विज्ञानवादी विचारांसह जगण्याचे आवाहन केले. डॉ. विजय गायकवाड यांनी सत्यशोधक विधी केले. ए. डी. पाटील, धोंडीराम पाटील यांनी संयोजन केले. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, डॉ. जितेश कदम, डॉ. संजय पाटील, प्रणिता पवार, अनंत सावंत, सुभाष सावंत, जयवंत सावंत, संभाजी पोळ, राहुल थोरात, प्रा. प्रताप पाटील, प्रा. नंदा पाटील उपस्थित होते.