Sangli News: गुन्ह्यात मदतीसाठी स्वीकारलेली लाच भोवली, आटपाडीचे पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 04:12 PM2023-01-09T16:12:09+5:302023-01-09T16:13:24+5:30
लाच घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल
आटपाडी : एका युवकाला गुन्ह्यात मदत करतो, म्हणून स्वीकारलेली लाच आटपाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी यांना भावली आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी गोसावी यांचे निलंबन केले आहे.
करगणी (ता. आटपाडी) येथील सागर बाबाजी जगदाळे या तरुणावर आटपाडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा खोटा असून खोटी फिर्याद देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या तरुणाने पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार देत केली होती.
दरम्यान, यावेळी पोलिस अधीक्षक तेली यांनी संबंधित तक्रारीबाबत आटपाडी पोलिस ठाण्यामध्ये चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अनेकवेळा दाखल असलेल्या खोट्या गुन्हांबाबात कोणतीच कारवाई होत नसल्याने व गुन्हाबाबात पोलिस योग्य तपास करत नसल्याचा आरोप जगदाळे यांनी पोलिस प्रमुख यांच्याकडे केला होता.
युवकावर दाखल असलेला गुन्हाचा तपास पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी यांच्याकडे होता. दरम्यान, या गुन्ह्याबाबत सागर जगदाळे यास मदत करतो म्हणून पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी यांनी पैसे घेतले होते. याबाबत सागर जगदाळे या तरुणाने पोलिस अधीक्षकांना १३ डिसेंबर रोजी अर्ज देत पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी यांनी माझ्यावर दाखल असलेल्या खोट्या गुन्हात मदत करतो म्हणून, लाच मागत ती पोलिस ठाण्यामध्येच स्वीकारल्याची तक्रार देत व्हिडीओ सादर केला होता.
लाच घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक व दाखल केलेल्या खोट्या फिर्यादी या आधारावर गुन्हा दाखल न झाल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक गोसावी यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईने आटपाडी तालुक्यामध्ये खळबळ माजली आहे.
लाच घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल
आटपाडी पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असणारे पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी यांनी सागर जगदाळे या तरुणांकडून दाखल असलेल्या गुन्हामध्ये मदत करतो म्हणून, पोलिस ठाण्यामध्येच लाच स्वीकारलेचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. दरम्यान, याबाबत पोलिस ठाण्यात होत असणाऱ्या अनेक घटनांबाबत सुप्त चर्चांना ऊत आला होता.