बनावट सोने देऊन इस्लामपुरातील व्यापाऱ्याला घातला गंडा, कोल्हापूरच्या दोघांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 11:59 AM2023-02-08T11:59:18+5:302023-02-08T12:00:01+5:30
आईच्या उपचाराकरिता दोन चैन ठेवून घेत पैसे देण्याची मागणी
इस्लामपूर : येथील बसस्थानक परिसरातील ओंकार कॉलनीमधील व्यापाऱ्यास कोल्हापूर येथील दोघांनी बनावट सोन्याचे दागिने देत ३ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. हा प्रकार ३१ जानेवारीला सायंकाळी ७ च्या सुमारास घडला.
याबाबत नितीन मनोहरलाल भंडारी (वय ४३ रा. ओंकार कॉलनी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद पारसमल भंडारी (रा. बिंदू चौक,कोल्हापूर) आणि विरेश ऊर्फ लोकेश आण्णाप्पा कुरले (रा. ऐश्वर्या पार्क, कोल्हापूर) या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोल्हापूर येथील विनोद भंडारी आणि विरेश कुरले हे दोघे ३१ जानेवारीला इस्लामपूर येथील नितीन भंडारी यांच्याकडे आले होते. यावेळी विनोद याने विरेशच्या आईच्या उपचाराकरिता पाच लाख रुपयांची आवश्यकता आहे,असे सांगत विरेशकडील ८३ ग्रॅम वजनाच्या हॉलमार्क असलेल्या दोन चैन ठेवून घेत पैसे देण्याची मागणी केली.
त्यावर नितीन भंडारी यांनी परतफेडीच्या बोलीवर दोघांना ३ लाख २५ हजार दिले. त्यानंतर त्यांनी या दोन सोन्याच्या चेनची तपासणी केली असता त्या खोट्या असल्याचे आढळून आले. नितीन भंडारी यांनी दोघांकडे पैशाची मागणी केल्यावर दोघांनी पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नितीन भंडारी यांनी पोलिसात फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक अनिल जाधव अधिक तपास करीत आहेत.
रॅकेट असण्याची शक्यता
कोल्हापुरातील दोघा भामट्यांनी येथील व्यापाऱ्यास बनावट दागिने हॉलमार्क दाखवून खरे भासविण्याचा प्रताप केला. वास्तविक हॉलमार्क हा सोने व्यापारातील शासकीय सनद मानला जातो. त्याचा गैरवापर करत या दोघांनी बऱ्याचजणांची फसवणूक केल्याची शक्यता नाकारता येत नाही. आईच्या उपचाराचा बहाणा करत या दोघांनी चैनबाजी केल्याचीही चर्चा आहे. याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे.