Sangli: बेडग येथे धनंजय मुंडे यांच्या मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 19:24 IST2025-04-24T19:24:19+5:302025-04-24T19:24:55+5:30

मिरज : बेडग (ता. मिरज) येथे शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण, दमदाटी करून शेतातील झोपडी पाडल्याबद्दल मिरज ग्रामीण पोलिसात माजी ...

A case has been registered against Dhananjay Munde brother in law in Bedg Sangli what is the exact case.. Read in detail | Sangli: बेडग येथे धनंजय मुंडे यांच्या मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय.. वाचा सविस्तर

संग्रहित छाया

मिरज : बेडग (ता. मिरज) येथे शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण, दमदाटी करून शेतातील झोपडी पाडल्याबद्दल मिरज ग्रामीण पोलिसात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे व युवा राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब ओमासे यांच्यासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेडग येथे गट नंबर २२५८ मधील दीड एकर जमिनीच्या मालकीबाबत राहुल ओमासे व जितेंद्र ओमासे यांच्यात वाद आहे. हे प्रकरण न्यायालयातही सुरू आहे. याबाबत न्यायालयाकडून आदेश मिळाल्याचा दावा करीत दि. २२ रोजी दुपारी दोन वाजता जितेंद्र ओमासे व जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब ओमासे, रघू नागरगोजे, नेताजी ओमासे, मल्हारी खाडे, स्वप्निल साबळे (सर्व रा. बेडग) हे बेकायदा जमाव जमवून वाद सुरू असलेल्या शेतात गेले. तेथे राहुल ओमासे यांच्या ताब्यातील जमीन आपल्या ताब्यात घेण्यासाठी ओमासे यांच्या झोपडीत घुसून त्यांना घराबाहेर काढून त्यांची झोपडी पाडून नुकसान केले. 

यावेळी राहुल ओमासे यांचे वडील सुरेश यांना मारहाण करून राहुल व त्यांच्या आईस शिवीगाळ केल्याची तक्रार आहे. याबाबत राहुल सुरेश ओमासे (वय २४, रा. बेडग, ता. मिरज) यांनी फिर्याद दिली असून, मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात जितेंद्र ऊर्फ बाळासो ओमासे, रघू नागरगोजे, नेताजी ओमासे, मल्हारी खाडे, स्वप्निल साबळे (सर्व रा. बेडग) यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११९(१), ३३३, १८९(२), १९०, १९१(२), ३५१(२), ३५२, ३२४(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक माने यांनी भेट दिली. याप्रकरणी आरोपींना अद्याप अटक केली नसल्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक दीपक माने यांनी सांगितले.

Web Title: A case has been registered against Dhananjay Munde brother in law in Bedg Sangli what is the exact case.. Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.