गर्भपातप्रकरणी चार डॉक्टरांवर गुन्हा दाखल, नातेवाईकही ताब्यात; जयसिंगपूर, सांगलीतील डॉक्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 12:35 PM2024-05-29T12:35:04+5:302024-05-29T12:35:46+5:30
सांगली : कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपुरम येथे गर्भपात केल्यानंतर मृत्यू पावलेल्या महिलेच्या मृतदेहासह सांगलीत फिरणाऱ्या नातेवाइकांना पोलिसांनी सोमवारी रात्री ...
सांगली : कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपुरम येथे गर्भपात केल्यानंतर मृत्यू पावलेल्या महिलेच्या मृतदेहासह सांगलीत फिरणाऱ्या नातेवाइकांना पोलिसांनी सोमवारी रात्री ताब्यात घेतले होते. या प्रकरणात चार वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगली पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आले आहे.
यामध्ये जयसिंंगपूर आणि सांगलीतील प्रत्येकी एक आणि महालिंगपूरम येथील दोन डॉक्टर आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो महालिंगपुरम ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गर्भपात केल्यानंतर मृत झालेले अर्भकही माेटारीतच आढळून आले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर पोलिसांच्या पथकाने सांगलीवाडीतील सुनील मल्लीनाथ माळगे याच्यावर कारवाई केली होती. त्याच्याकडून गर्भपाताच्या गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी बसस्थानक परिसरात कारवाई करून गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आणले. एका माेटारीमध्ये विवाहित महिलेचा मृतदेह घेऊन मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महिलेचे नातेवाईक आणि एक वैद्यकीय अधिकारी यांना बसस्थानक परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
नातेवाइकांसमवेत असणारा अधिकारी हा पदवी घेतलेला आहे की बोगस आहे याची शहनिशा करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय गर्भलिंगनिदान चाचणी जयसिंगपूरमधील ज्या रुग्णालयात करण्यात आली, तेथील एक वैद्यकीय अधिकारी आणि प्रत्यक्ष महालिंगपुरम येथे गर्भपात शस्त्रक्रियेत सहभागी असणारे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सांगली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सायंकाळी येथे दाखल झालेला गुन्हा वर्ग करण्यासाठी महालिंगपुरम येथे रवाना झाले आहेत.