यात्रेनंतर ६५ किलोमीटरपर्यंत घोड्यांची फरफट, सांगलीवाडीतील सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

By घनशाम नवाथे | Updated: February 27, 2025 00:00 IST2025-02-26T23:59:48+5:302025-02-27T00:00:19+5:30

Sangli News: कर्नाटकातील मायाक्का चिंचली यात्रेतून सांगलीवाडीपर्यंत तब्बल ६५ किलोमीटर अंतरापर्यंत तोंडाला फेस येईपर्यंत घोडागाडी जबरदस्तीने पळवणाऱ्या सहाजणांविरुद्ध सांगली शहर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला.

A case has been registered against six persons from Sangliwadi for 65 kilometers of horses running after the Yatra | यात्रेनंतर ६५ किलोमीटरपर्यंत घोड्यांची फरफट, सांगलीवाडीतील सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

यात्रेनंतर ६५ किलोमीटरपर्यंत घोड्यांची फरफट, सांगलीवाडीतील सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

- घनशाम नवाथे  
सांगली - कर्नाटकातील मायाक्का चिंचली यात्रेतून सांगलीवाडीपर्यंत तब्बल ६५ किलोमीटर अंतरापर्यंत तोंडाला फेस येईपर्यंत घोडागाडी जबरदस्तीने पळवणाऱ्या सहाजणांविरुद्ध सांगली शहर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला.

संशयित पंकज अभिजित कांबळे (रा. बाळूमामा मंदिरजवळ, सांगलीवाडी), सचिन गोविंद शिंदे (रा. क्रांती चौक), चंद्रकांत दीपक फडतरे (रा. हनुमान चौक), दत्तात्रय कदम (रा. राहुलराजे चौक), मयूर महादेव पवार (रा. सोसायटीजवळ), कृष्णा दत्तात्रय बोराडे (रा. गाडगीळ प्लॉट, सांगलीवाडी) या सहाजणांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा १९६० नुसार आणि बीएनएस २२३, २८१, २८५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

मायाक्का चिंचलीची यात्रा संपल्यानंतर मध्यरात्रीनंतर शहरातून हुल्लडबाजी, आरडाओरड करत नागरिकांची झोपमोड करण्याचा प्रकार गतवर्षी घडला होता. यावर्षी दि. १७ रोजी मध्यरात्रीनंतर दोन वाजता शेकडो घोडागाडी, बैलगाडी, दुचाकी घेऊन जमाव हुल्लडबाजी करत सांगलीवाडी निघाला होता. तेव्हा सांगलीत टिळक चौकात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांनी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर लाठीमार करताच त्यांची पळताभुई थोडी झाली. अनेकजण दुचाकी जागेवर टाकून पळाले. काहींनी घोडागाड्या दामटून पलायन केले.

हुल्लडबाजी करणाऱ्यांची पोलिसांनी चांगलीच खोड मोडल्याबद्दल नागरिकांनी कौतुक केले. समाज माध्यमावर पोलिस कारवाईचे स्वागत झाले. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी ही कारवाई करणाऱ्या पोलिस निरीक्षक किरण चौगले यांना शाबासकी दिली.

दरम्यान, मायाक्का चिंचली ते सांगलीवाडी असे ६५ किलोमीटर विनापरवाना घोडागाड्या पळवल्या. गुलालाची उधळण केली. दुचाकीवरून आरडाओरड केला. बेदरकारपणे वाहने चालवली. तसेच घोडागाडीला दोन्ही बाजूंनी दुचाकींनी जबरदस्तीने ओढून घोड्यांना तोंडाला फेस येईपर्यंत पळवले. त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त ओढून छळ केल्याबद्दल पोलिसांनी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस कर्मचारी सद्दामहुसेन मुजावर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

इतरांचाही शोध घेणार
मध्यरात्रीनंतर दोन वाजता दंगा करणाऱ्या सहाजणांची नावे निष्पन्न करून गुन्हा दाखल केला आहे. इतरांचाही शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: A case has been registered against six persons from Sangliwadi for 65 kilometers of horses running after the Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली