सांगली महापालिकेच्या शाखा अभियंत्यावर लाचप्रकरणी गुन्हा दाखल, कामाच्या मोबदल्यात ४५ हजारांची मागणी
By शरद जाधव | Published: September 6, 2022 06:34 PM2022-09-06T18:34:58+5:302022-09-06T18:35:59+5:30
तक्रारदाराची शंका आल्याने मकानदार याने लाच स्विकारली नाही मात्र, मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली : दोन प्लॉटचे एकत्रीकरण व त्यावर बांधकामासाठी परवाना देण्याच्या मोबदल्यात ४५ हजार रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाकडील शाखा अभियंत्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. अल्ताफ मकबूल मकानदार (वय ४४, रा. अल्फोन्सा स्कूलजवळ, मिरज) असे अभियंत्याचे नाव असून, तक्रारदाराची शंका आल्याने मकानदार याने लाच स्विकारली नाही मात्र, मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाने दोन प्लॉटचे एकत्रिकरण व त्यावर बांधकाम परवाना मिळविण्यासाठी महापालिकेच्या कुपवाड येथील कार्यालयाकडे अर्ज केला होता. यावेळी शाखा अभियंता मकानदार याने तक्रारदाराकडे ४५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर १० नोव्हेंबर २०२१ रोजी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार ‘लाचलुचपत’ने केलेल्या पडताळणीत पैसे मागितल्याचे निष्पन्न झाले होते.
१० फेब्रुवारी २०२२ रोजी लाचलुचपत विभागाच्या पथकाने पुन्हा पडताळणी केली असता, मकानदार याने जुने काम करुन दिल्याच्या मोबदल्यात ४० हजार व चर्चेअंती ३० हजार रुपये लाच मागणी केल्याचे सिध्द झाले होते. मात्र, मकानदार याला तक्रारदाराची शंका आल्याने त्याने लाचेची रक्कम स्विकारली नाही. लाचेची मागणी केल्याबद्दल मकानदार याच्यावर कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया उशिरापर्यंत सुरु होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गुरुदत्त मोरे, संजय भिलारे, दत्तात्रय पुजारी, अविनाश सागर, संजय संकपाळ यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.