सोशल मीडियावर राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यावर गुन्हा दाखल, सांगलीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 01:18 PM2022-09-21T13:18:33+5:302022-09-21T13:19:16+5:30
राष्ट्रध्वजाचा अवमान करुन देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधा येईल अशी पोस्ट केली होती.
सांगली : सोशल मीडियावर राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करणारा मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी एकावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी भालचंद्र होनमोरे (रा. माधवनगर) यांनी अब्दुलसाद तांबोळी (रा. सांगलीवाडी) याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवार दि. १७ रोजी रात्रीच्या पावणे आठच्या सुमारास हा प्रकार घडला. व्हॉटसॲपवर कार्स ॲण्ड बाईक्स मार्केट या नावाने एक ग्रुप आहे. या ग्रुपवर संशयित तांबोळी याने राष्ट्रध्वजाचा अवमान करुन देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधा येईल अशी पोस्ट केली होती. यामुळे ग्रुपमधील सदस्यांच्या भावना दुखावल्या होत्या.
त्यानंतर होनमोरे यांनी तांबोळी याच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार तांबोळी याच्यावर माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली.