शासनाच्या ७६ लाखांच्या निधीवर डल्ला; सांगलीतील तिघांवर गुन्हा
By शरद जाधव | Published: August 3, 2022 09:54 PM2022-08-03T21:54:01+5:302022-08-03T21:54:48+5:30
सफाई कामगारांसाठी संस्था स्थापून मिळवला निधी
शरद जाधव / लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: सफाई कामगार मागासवर्गीय सहकारी संस्थेची स्थापना करुन शासनाकडून निधी मिळवून त्यात ७६ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी तिघांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दिलीप यशवंत एडके (रा. वासुंबे ता. तासगाव) यांनी जीवन सदाशिव कोलप (रा. इनामधामणी ता.मिरज), संस्थेचा सचिव अरविंद पांडुरंग पाटील व कंत्राटदार सतीश बापूसाहेब देसाई (रा. माळी कॉलनी, कोल्हापूर) यांच्याविरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हा प्रकार सन २०१० ते २०१६ पर्यंत झाला होता. संशयितांपैकी कोलप व पाटील यांनी सफाई कामगार मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना करुन शासनाकडून एक कोटी रुपयांचे अनुदान घेतले होते. या अनुदानातून त्यांनी वाडीभागाई (ता. शिराळा) येथे इमारत उभारण्यास सुरुवात केली. याचे काम कंत्राटदार देसाई यास दिले होते. काम सुरु असल्याचे दाखवत त्यांनी ७६ लाख रुपये उचलले होते. मात्र, प्रत्यक्षात काम केले नाही. शासनाकडून निधीच्या विनीयोगाबाबत माहिती मागविण्यात आली होती मात्र, ती संशयितांनी न दिल्याने तिघांवरही शासनाच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.