तासगावात निवडणुकीसाठी पैसे वाटणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, रोहित पाटील गटाचे कार्यकर्ते
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 06:06 PM2024-11-05T18:06:39+5:302024-11-05T18:07:23+5:30
बदनामीसाठी षडयंत्र : रोहित पाटील
तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांच्यासाठी पैसे वाटप होत असल्याचा प्रकार संजय पाटील समर्थकांनी चव्हाट्यावर आणला. रविवारी सायंकाळी तासगाव येथील साठेनगर भागात दिवाळीच्या फराळासोबत प्रत्येक कुटुंबामध्ये तीन हजार रुपयांच्या पाकिटाचे वाटप करण्यात येत होते. याप्रकरणी सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील व बाबासाहेब उर्फ खंडू निवृत्ती कदम या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पाटील व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे संजय पाटील यांच्यामध्ये लढत होत आहे. रविवारी सायंकाळी तासगाव येथील साठेनगर भागात खंडू कदम व सचिन पाटील हे दोघे दिवाळीचा फराळ व प्रत्येकी तीन हजार रुपयांचे पाकीट एका कुटुंबामध्ये देत होते. या प्रकाराची माहिती समजल्यानंतर संजय पाटील समर्थक त्याठिकाणी गेले व त्यांनी पैसे वाटप करताना दोन्ही कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले. यावेळी खंडू कदम पळून जाण्यात यशस्वी झाला तर सचिन पाटील यांना पकडून कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात आणले.
या घटनेची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली. निवडणूक आयोगाचे शिवप्रसाद भिसे हे पथकासह घटनास्थळी आले. तोपर्यंत पैसे वाटप करणाऱ्यांना संजय पाटील समर्थकांनी तासगाव पोलिस ठाण्यात नेले होते. पोलिस ठाण्यात दोन्ही गटाचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले.
निवडणूक विभागातील शिवप्रसाद भिसे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन पाटील व खंडू कदम या दोघांसह रोहित पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार समजताच संजय पाटील यांनी तासगाव पोलिस ठाण्यामध्ये धाव घेतली. पैसे वाटप प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. पोलिस व निवडणूक विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली. त्यानंतर आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनीही पोलिस ठाण्यामध्ये येऊन पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
बदनामीसाठी षडयंत्र : रोहित पाटील
तासगाव येथील पैसे वाटपाशी माझा काहीही संबंध नाही. दिवंगत आर. आर. पाटील यांनाही विरोधकांनी अशाचप्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणाची पोलिसांनी नि:पक्षपातीपणे चौकशी करावी, अशी मी मागणी केली असल्याचे रोहित पाटील यांनी सांगितले.