Sangli: पोलिस भरतीसाठी चक्क सहा वर्षे कमी वय दाखविले, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 11:44 AM2024-08-17T11:44:09+5:302024-08-17T11:45:13+5:30
सांगली : पोलिस भरतीसाठी चक्क सहा वर्षे वय कमी करून खोटी जन्मतारीख बाबतीत बनावट कागदपत्रे दाखल करून फसवणूक केल्याचा ...
सांगली : पोलिस भरतीसाठी चक्क सहा वर्षे वय कमी करून खोटी जन्मतारीख बाबतीत बनावट कागदपत्रे दाखल करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत बसाप्पा पिरगोंड हिप्परगी (रा. सिंदूर, ता. जत) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक (गृह) अरविंद बोडके यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
जिल्हा पोलिस दलात शिपाई आणि चालक पदासाठी दि. १९ जून ते १४ जुलै दरम्यान भरती प्रक्रिया राबवण्यात आली. भरतीसाठी जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून उमेदवार आले होते. शारीरिक चाचणी, मैदानी चाचणी, लेखी परीक्षेनंतर उमेदवार जाहीर करण्यात आले. संशयित बसाप्पा हिप्परगी हा देखील आला होता. त्याने भरती प्रक्रियेत वय कमी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी बनावट कागदपत्रे बनवली. १९९७ चा जन्म असताना २००३ चा जन्म दाखवला. त्यासाठी त्याने आधारकार्ड, वाहन चालक परवान, शाळा सोडल्याचा दाखला, डोमेसाईल प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र अशी कागदपत्रे बनावट बनवून घेतली. कोणाच्या तरी मदतीने तयार करून घेतलेली कागदपत्रे खरी असल्याचे बसाप्पा याने भासवले.
बसाप्पा याची शारीरिक, मैदानी चाचणीतून लेखी परीक्षेला निवड झाली. त्यानंतर तो चालक पदासाठी पात्र ठरला. तात्पुरत्या अंतिम यादीत त्याची निवड निश्चित झाली होती. भरती प्रक्रियेनंतर बसाप्पा याची कागदपत्रे फेर पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये बसाप्पा याने सहा वर्षे वय कमी दाखवल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.