धावा, धावा, पत्नीवर बलात्कार होतोय!, हेल्पलाइनवर फोन येताच पोलिसांची धावपळ, अन्..
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 12:44 PM2022-12-23T12:44:21+5:302022-12-23T12:44:51+5:30
कोल्हापुरातील दाम्पत्यावर आटपाडी पोलिसांनी दाखल केला गुन्हा
आटपाडी : नागरिकांना संकटकाळात मदतीसाठी पोलिसांनी ११२ हेल्पलाइन सुरू केली आहे; पण तिचा दुरूपयोग करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या कोल्हापुरातील दाम्पत्यावर आटपाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारी (दि. २१) दुपारी दोन वाजता आटपाडी पोलिसांना हेल्पलाइनवरून एक संदेश मिळाला. रुक्मिणी नांदिवडेकर नामक महिला संकटात असून तिला मदतीची गरज आहे, असे सांगण्यात आले. तिचा मोबाइल क्रमांकही देण्यात आला. कर्मचारी डॉलर कोळेकर यांनी तातडीने या मोबाइलवर संपर्क केला. मोबाइलवर भागेश नांदिवडेकर नामक व्यक्तीने सांगितले की, शेटफळे (ता. आटपाडी) येथील नामदेव मोरे नामक व्यक्तीशी आमचा पैशांच्या देवघेवीचा जुना वाद आहे. तो मिटविण्यासाठी आम्ही पती- पत्नी जुनोनी (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथे आलो आहोत. यावेळी मोरे याने पत्नी रुक्मिणीवर बलात्काराची धमकी दिली आहे. त्यामुळे तातडीने मदत करावी.
डॉलर कोळेकर यांनी आणखी विचारपूस केली असता, नांदिवडेकर दाम्पत्य जुनोनी येथे नसून कोल्हापुरातून बोलत असल्याचे स्पष्ट झाले. कोळेकर यांनी तशी कल्पना त्यांना दिली व जुनोनी सांगोला पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तेथे तक्रार नोंदविण्याची सूचना केली. दरम्यान, रुक्मिणी यांनी काही वेळांनी पुन्हा ११२ हेल्पलाइनवर फोन केला. आम्ही शेटफळे येथे आलो असून मोरे यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचे सांगितले. हेल्पलाइनवरून पुन्हा आटपाडी पोलिस ठाण्यात तसा संदेश देण्यात आला. त्यामुळे कोळेकर तातडीने शेटफळे येथे गेले; पण नांदिवडेकर दाम्पत्य तेथे नसल्याचे दिसून आले.
त्यांच्याशी संपर्क केला असता कोल्हापुरातूनच फोन करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस यंत्रणेच्या आपत्कालीन मदत यंत्रणेचा गैरवापर करणे, पोलिसांना विनाकारण चुकीची महिती देऊन त्रास देणे, दिशाभूल करणे, मदतीच्या भूमिकेतील पोलिसांशी फोनवरून उद्धट भाषेत बोलणे याबद्दल गुन्हे दाखल झाले आहेत. अधिक तपास पोलिस नाईक दादासाहेब ठोंबरे करीत आहेत.