इस्लामपुरात मंडल अधिकाऱ्यासह १० जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
By श्रीनिवास नागे | Published: September 30, 2022 04:08 PM2022-09-30T16:08:21+5:302022-09-30T16:08:54+5:30
मूळ मालकाच्या संमतीशिवाय १० जणांनी संगनमत करत जागा परस्पर विकल्याचा प्रकार उघडकीस आला
सांगली : इस्लामपूर शहरातील सर्व्हे नंबर ५४ मधील १२ गुंठे जागा मूळ मालकाच्या संमतीशिवाय १० जणांनी संगनमत करत परस्पर विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये मंडल अधिकारी, तलाठी यांच्यासह १० जणांविरुद्ध दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जागा मालक विजय बापू पाखरे (वय ५४, रा. कचरे गल्ली, इस्लामपूर, सध्या शेरे-कराड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भूखंड घोटाळा करणारा मुख्य संशयित विजय संभाजी जाधव (इस्लामपूर) याच्यासह सुजीत दिलीप थोरात (महादेवनगर), निलेश संपत बडेकर (इस्लामपूर), सोमनाथ बाळासाहेब माने (नेर्ले), कुलदीप हणमंत जाधव (बुरुंगवाडी-पलूस), अरुण राजेंद्र गवळी (इस्लामपूर), किर्तीकुमार अण्णा पाटील (ऐतवडे बुद्रुक), विठ्ठल मारुती कांबळे (कार्वे- तत्कालीन तलाठी), संभाजी दत्तात्रय हंगे (सांगली- तत्कालीन मंडल अधिकारी) व सुरेश अण्णा सावंत (काळमवाडी) अशा दहा जणांविरुद्ध या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. फसवणुकीची ही घटना जून २०१५ आणि मे २०२२ मध्ये येथील दुय्यम निबंधक कार्यालयात घडली आहे.
सर्व्हे नं. ५४ मध्ये पाखरे कुटुंबाची जमीन होती. त्यातील चार गुंठे जागा विजय पाखरे यांच्या वहिवाटीत होती. मुलांच्या शिक्षणाकरिता पैशाची गरज असल्याने त्यांनी ती विक्रीस काढली होती. पाखरे यांचा भाचा निलेश बडेकर याच्या मध्यस्थीने मुख्य संशयित विजय जाधव याने ७ लाख ७० हजार रुपयाला ती खरेदी करण्याचे मान्य केले. त्यासाठी १ लाख रुपये इसारा म्हणून दिली. मात्र त्याच वेळी तुकडेबंदी कायदा असल्याने गुंठेवारीचे खरेदी-विक्री व्यवहार बंद आहेत. त्यासाठी प्रांताधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे म्हणून पाखरे यांच्याकडून अर्ज घेतला. त्या अर्जावर प्रांताचा आदेश घेतल्याचे सांगून २०१५ मध्ये जाधव याने पाखरे यांची चार गुंठे जमीन खरेदी केली.
या जमिनीची नोंद घालण्यापूर्वी जाधव याने खरेदीदस्तासह प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशात फेरफार करत पाखरे कुटुंबाकडे असलेल्या संपूर्ण १२ गुंठे जमिनीची नोंद तत्कालीन तलाठी कांबळे यांच्याकडून स्वत:च्या नावे करून घेतली. त्यानंतर मे २२ मध्ये विजय जाधव याने ही संपूर्ण १२ गुंठे जमीन २५ लाख रुपयांचा मोबदला घेत सुजित थोरात यांना विक्री केली. त्यानंतर थोरात हे या जमिनीस संरक्षक भिंत घालण्याकरिता गेल्यावर फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला. विटा उपविभागाच्या पोलिस उपअधीक्षक पद्मा कदम अधिक तपास करत आहेत.