Sangli: संगणक ऑपरेटरने गॅस एजन्सीला घातला ६४ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 12:24 PM2023-11-07T12:24:57+5:302023-11-07T12:26:15+5:30
गुन्हा दाखल झाल्यावर हा ठकसेन झाला पसार
इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील ओम गुरुदेव इंडेन गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्या संगणक ऑपरेटरने गॅस कंपनीला ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठविल्याचे भासवत तब्बल ६४ लाख ३३ हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार एप्रिल २१ ते एप्रिल २०२३ या दोन वर्षांच्या कालावधीत घडला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर हा ठकसेन पसार झाला आहे.
याबाबत गॅस एजन्सीचे व्यवस्थापक भरत अर्जुन जाधव (इस्लामपूर) यांनी इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संगणक ऑपरेटर सागर आनंदा तेवरे (३८, रा. शिक्षक कॉलनी, टकलाईनगर, इस्लामपूर) याच्याविरुद्ध ठकबाजी आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शहरात ओम गुरुदेव इंडेन गॅस एजन्सी ही ग्राहकांना गॅस सिलिंडर देणारी आस्थापना आहे. याठिकाणी संशयित सागर तेवरे हा संगणक ऑपरेटर म्हणून काम पाहत होता.
या एजन्सीकडे ग्राहकांना सिलिंडर देण्यासाठी किरण नारायण कांबळे, महादेव नारायण कांबळे, दत्तात्रय नारायण कांबळे आणि सुनील निवृत्ती लोखंडे हे चार कर्मचारी काम करत असत. काही ग्राहक ऑनलाइन तर काही रोखीने पैसे या कर्मचाऱ्यांकडे द्यायचे. कर्मचारी ही रक्कम सागर तेवरे याच्याकडे जमा करत असत.
कर्मचाऱ्यांकडून आलेली रक्कम तेवरे हा स्वतःकडे ठेवून घ्यायचा. त्यानंतर मोबाइलवरून गॅस कंपनीच्या ॲपवर रक्कम पाठविल्याचे भासवत देणे शून्य असल्याची पावती काढून या कर्मचाऱ्यांकडे द्यायचा. मात्र, ही रक्कम तो स्वतः च्या खात्यावर पाठवून गॅस एजन्सीची दिशाभूल करत होता. या कारभाराचे बिंग फुटल्यावर त्याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.