सांगलीतील बेरडमाचीत भरदिवसा बांधकाम कामगाराचा खून, हल्लेखोर अज्ञात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 11:29 AM2023-06-16T11:29:36+5:302023-06-16T12:34:52+5:30
जीव वाचविण्याच्या आकांताने पळत गेला. मात्र, तेथेच कोसळून पडला.
इस्लामपूर : बेरडमाची (ता. वाळवा) गावच्या हद्दीतील कदम विहीर परिसरात बांधकाम कामगाराचा अज्ञाताने डोक्यात हत्याराने वार करून खून केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली. खुनाचे नेमके कारण आणि हल्लेखोर यांची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
बाजीराव पाटोळे (पूर्ण नाव नाही, वय ४८, रा. बेरडमाची) असे खून झालेल्या बांधकाम कामगाराचे नाव आहे. तो गवंडी काम करत होता. गावातील कदम विहिरीजवळ त्याच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. त्याच्यावर हत्याराने वार झाले. अचानक झालेल्या हल्ल्याने गंभीर जखमी झालेला बाजीराव २०० ते ३०० फूट अंतरापर्यंत जीव वाचविण्याच्या आकांताने पळत गेला. मात्र, तेथेच कोसळून पडला.
सांगली जिल्ह्यात खुनाची मालिका
परिसरातील ग्रामस्थांनी त्याला उपचारासाठी कराड येथे पाठवले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. रात्री उशिरापर्यंत त्याचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ल्याचे नेमके कारण आणि हल्लेखोराची माहिती मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू होता. सांगली जिल्ह्यात एकापाठोपाठ एक खुनाची मालिका सुरू असताना आता इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याचे लोण पसरले आहे.