बाराव्याच्या विधीसाठी निघालेल्या चव्हाण कुटुंबावर काळाचा घाला, कार उलटून दोघे ठार; कवठेमहांकाळ तालुक्यात अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 12:29 PM2022-02-09T12:29:05+5:302022-02-09T12:29:57+5:30
कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडीजवळ मोटार उलटून दाम्पत्य ठार, तर चौघे जखमी झाले. पृथ्वीराज दौलत चव्हाण ...
कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडीजवळ मोटार उलटून दाम्पत्य ठार, तर चौघे जखमी झाले. पृथ्वीराज दौलत चव्हाण (वय ५५) व प्रियंका पृथ्वीराज चव्हाण (५०, रा. कसबे डिग्रज, ता. मिरज) अशी मृतांची नावे आहेत. सर्व अपघातग्रस्त बीड येथील नातेवाइकांच्या बाराव्याच्या विधीसाठी निघाले होते. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता हा अपघात घडला.
विलास महादेव माने (५४), अनिता विलास माने (३८, दोघे रा. सांगली), विवेक चव्हाण (५०), विजया विवेक चव्हाण (४५, दोघे रा. ममदापूर, जि. बेळगाव) जखमी असून त्यांच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कसबे डिग्रज येथील चव्हाण दाम्पत्य, पृथ्वीराज चव्हाण यांचे साडू विलास माने व विवेक चव्हाण, दोन मेहुण्या अनिता माने व विजया चव्हाण असे सहा जण मोटारीतून (क्रमांक केए २३, एन ७०७४) बीड येथे नातेवाइकांच्या बाराव्याच्या विधीसाठी निघाले होते.
मंगळवारी पहाटे त्यांची गाडी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील विठ्ठलवाडीजवळ पहाटे साडेपाच वाजता उलटली. ती तशीच ५० ते ६० मीटर घसरत गेली. यामध्ये प्रियंका चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण हे पती-पत्नी जागीच ठार झाले, तर माने आणि चव्हाण दाम्पत्य जखमी झाले. त्यांच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कवठेमहांकाळ पोलिसांत या अपघाताची नोंद झाली आहे.
मृत पृथ्वीराज चव्हाण सर्वोदय साखर कारखान्यात कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात आई, मुलगा, विवाहित मुलगी, असा परिवार आहे.