Sangli: छतावरून पडलेल्या गंभीर बालकाला मिळाले जीवदान, पतंग उडविताना झाला होता जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:38 IST2025-02-10T13:37:45+5:302025-02-10T13:38:02+5:30
शासकीय रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया : सामाजिक कार्यकर्ते सरसावले

Sangli: छतावरून पडलेल्या गंभीर बालकाला मिळाले जीवदान, पतंग उडविताना झाला होता जखमी
सांगली : पतंग उडविताना छतावरून पडून गंभीररीत्या जखमी झालेल्या अकरा वर्षीय बालकावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने जीवदान मिळाले. सांगली, मिरजेतील सामाजिक कार्यकर्त्यांनीही या मुलावरील उपचारासाठी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला.
सांगली एमआयडीसी भागात राहणारा अकरा वर्षीय शाळकरी मुलगा घराच्या छतावर पतंग उडवित होता. तोल जाऊन पहिल्या मजल्यावरून तो खाली पडला. त्याच्या डोक्याच्या आतील भागात गंभीर इजा झाली होती. सिटीस्कॅन केल्यानंतर त्याच्या डोक्यात रक्तस्राव झाल्याचे स्पष्ट झाले. १५ मि. मी.ची एक रक्ताची गुठळी तयार झाली होती.
हातावरचे पोट असणाऱ्या या मुलाच्या कुटुंबीयांनी सांगली, मिरजेतील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवले. मात्र, शस्त्रक्रियेसाठी अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च त्यांना सांगण्यात आला. इतका मोठा खर्च ते करू शकत नव्हते. त्यामुळे हे कुटुंब हतबल व चिंताग्रस्त बनले. मुलाच्या एका नातेवाइकाने सामाजिक कार्यकर्ते अजहर सय्यद यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सय्यद यांनी याची कल्पना सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आयुब बारगीर यांना दिली.
बारगीर यांनी मुलाचे सर्व वैद्यकीय अहवाल घेऊन शासकीय रुग्णालयातील डॉ. अभिनंदन पाटील यांचा सल्ला घेतला. त्यांनी आठ दिवसांचे औषध देऊन निरीक्षण केले. त्यानंतर पुन्हा सिटीस्कॅन केल्यानंतर मेंदूतील रक्ताची गुठळी तशीच असल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्जरी करणे आवश्यक होते. त्यानुसार चार दिवसांपूर्वी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.
पदाधिकाऱ्यांकडून डॉक्टरांचे कौतुक
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता हारगे, शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय माळी, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष आयुब बारगीर, इर्शाद पखाली, अजहर सय्यद, सामाजिक कार्यकर्ते राहील मुल्ला, वाहिद खतिब यांनी मुलाच्या प्रकृतीची चौकशी करून यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे कौतुक केले.
पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तेरा वर्षांपासून आम्ही महाआरोग्य शिबिरातून सेवा देत आहोत. सांगलीतील बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्याने आम्हाला आनंद झाला. आमच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाकडे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे व मेंदू शल्यचिकित्सक डॉ. अभिनंदन पाटील व त्यांचा सर्जरी स्टाफ यांची भूमिका महत्त्वाची होती. - आयुब बारगीर, सामाजिक कार्यकर्ते सांगली.