धोकादायक गतिरोधकाने घेतला तरुणाचा बळी, सांगलीत अप्रमाणित रस्त्यांचा प्रश्न गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 06:41 PM2023-02-02T18:41:57+5:302023-02-02T18:42:21+5:30
गतिरोधक आणखी किती बळी घेणार?
सांगली : गतिरोधकावरून जाताना तोल जाऊन पडल्याने सांगलीतील हारीस राजू बागवान (वय २२) हा तरुण जागीच ठार झाला. बुधवारी पहाटे ही घटना घडली.
सांगली-मिरज रस्त्यावर विलिंग्डन कॉलेजच्या चौकात उंच गतिरोधक बसविण्यात आले आहेत. याच ठिकाणी मिरजेहून सांगलीला येणाऱ्या बागवान याचा मृत्यू झाला. गतिरोधकावरून गाडी घसरल्याने तो बाजूच्या कुंपणावर जाऊन आदळला. त्यामुळे त्याच्या छातीला, पोटाला जोराचा मार लागला. त्यात तो जागीच ठार झाला. त्याच्या पश्चात वडील, आई, भाऊ असा परिवार आहे.
गतिरोधक आणखी किती बळी घेणार?
सांगलीतील सर्वच ठिकाणचे गतिरोधक धोकादायक असून अनेकांचा यामुळे बळी गेला आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार, असा सवाल जुनी भाजी मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मुसाभाई सय्यद यांनी उपस्थित केला.