..अन् त्याने चालविली मोटारसायकल, सांगलीतील १३८ दिव्यांग झाले सक्षम
By अविनाश कोळी | Published: June 17, 2024 04:18 PM2024-06-17T16:18:52+5:302024-06-17T16:20:08+5:30
पुण्यातील विकलांग पुनर्वसन केंद्राचा सांगलीत उपक्रम
सांगली : दिव्यांग व्यक्तींना सक्षम व स्वावलंबी बनविण्याचे काम अत्याधुनिक मॉड्युलर हात व पायांनी सुरू केले आहे. याच साधनांनी सांगलीतील १३८ दिव्यांगांना सक्षमतेचे वरदान दिले. आजवर दुसऱ्याच्या आधाराने जीवन जगणाऱ्या एका दिव्यांग व्यक्तीने मॉड्युलर हात बसविल्यानंतर मोटारसायकल चालवून दाखविली अन् दिव्यांग, तसेच उपक्रम राबविणारे आयोजक भारावून गेले.
लाकडी हात किंवा जयपूर फूटमुळे काही प्रमाणात दिव्यांगांना आधार मिळत होता. मात्र, सामान्यपणे हालचाली करणे त्यांना शक्य होत नव्हते. अशा हालचाली करता येण्यासाठीच मॉड्युलर अवयवांचा जन्म झाला. मात्र, ते महागडे असल्याने सामान्य दिव्यांगांना ते खरेदी करणे शक्य नसते. याच गोष्टी जाणून दिव्यांगांसाठी गेली पंचवीस वर्षे कार्यरत असलेल्या पुणे येथील विकलांग पुनर्वसन केंद्राने यासाठी एक उपक्रम हाती घेतला.
संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त सांगली येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये भारत विकास परिषद, सांगली आणि कोथरुड-पुणे या शाखांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी मॉड्युलर हात व पायांचे मोफत वाटप करण्यात आले. शिबिरात १३८ दिव्यांग व्यक्तींना अत्याधुनिक मॉड्युलर पाय व हात बसविण्यात आले. कृत्रिम अवयव प्रदान सोहळा चितळे ग्रुपचे संचालक गिरीश चितळे आणि जुबिली उद्योग समूहाचे संचालक राजेंद्र घोडावत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या विशेष उपक्रमाला सिरम इन्स्टिट्युट होराॅयझन, कोटीभास्कर ग्रुप, चितळे उद्योग समूह, जुबिली इंडस्ट्रीज, खरे क्लब आणि पु.ना. गाडगीळ या उद्योजक संस्थांनी सीएसआर निधीतून साहाय्य दिले.
शिबिरातून केली निवड
संयोजक संस्थांनी चार महिन्यांपूर्वी दिव्यांग तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्यामध्ये २०० रुग्णांवर तपासणी करून १३८ जणांना रविवारी अवयव प्रदान करण्यात आले.
आजवर अशा कृत्रिम अवयवाद्वारे दोन हजार विकलांगांना दिव्यांग मुक्तीचा अनुभव मिळवून दिला आहे. त्यांना नवे जीवन लाभले याचे समाधान वाटते. - विनय खटावकर, प्रमुख, विकलांग पुनर्वसन केंद्र.