विटा येथील डॉक्टरची रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या, शहरात खळबळ
By अविनाश कोळी | Published: September 18, 2022 09:07 PM2022-09-18T21:07:08+5:302022-09-18T21:07:19+5:30
घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीत तपासणीसाठी पाठवून दिला.
विटा: शहरातील प्रसिद्ध डॉ. रावसाहेब रेवबा ऊर्फ आर. आर. पवार (वय ७०) यांनी त्यांच्या रुग्णालयातच पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजता उघडकीस आली. विटा-मायणी रस्त्यावरील पंचमुखी गणपती मंदिराजवळील पवार हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली.
विटा (गांधीनगर) येथील डॉ. रावसाहेब पवार यांचे येथील पंचमुखी गणपती मंदिराजवळील शालीमार ज्वेलर्स इमारतीतील मजल्यावर ‘पवार हॉस्पिटल’ गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होते. डॉ. पवार यांनी काही महिन्यांपासून प्रॅक्टिस बंद केली होती. तरीही ते अधुनमधून रुग्णालयात जाऊन बसत होते. रविवारी ते रुग्णालयात आले हाेते. त्यांनी पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने हा प्रकार त्यांच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आला.
त्यांनी याची कल्पना तातडीने पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीत तपासणीसाठी पाठवून दिला.
डॉ. पवार यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त शहरात पसरताच अनेकांना मोठा धक्का बसला. घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. डॉ. पवार यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.