अनैतिक संबंधाच्या संशयातून संसाराची राखरांगोळी, कुणीकाेणूरच्या दुहेरी खुनाने कुटुंब उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 05:11 PM2023-04-25T17:11:12+5:302023-04-25T17:12:04+5:30
निष्पाप मुलीचा दोष काय?
गजानन पाटील
दरीबडची : पती-पत्नीतील विश्वासाचे नाते संपले की कुटुंबाची राखरांगोळी कशी होते, हे जत तालुक्यातील कुणीकोणूर येथील माय-लेकीच्या खुनाने समाेर आले आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून बिरुदेव उर्फ बिराप्पा नाना बेळुंखी याने पत्नी प्रियांकाचा दाेरीने गळा आवळून खून केला. एवढ्यावरच न थांबता पत्नीचा खून करताना पाहिल्याने मुलगी मोहिनीचाही गळा आवळला. या साऱ्यात निष्पाप मुलीचा दोष काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत कुणीकोणूर गाव आहे. येथील सनमडी रस्त्यावर बिरुदेव उर्फ बिराप्पा बेळुंखी राहतो. चाैदा वर्षांपूर्वी त्याचा विवाह खैराव (ता. जत) येथील प्रियांका हिच्याशी झाला. उभयतांना दाेन मुले व दाेन मुली झाल्या. आई, पत्नी, दोन मुली, दाेन मुलांसमवेत संसाराचा गाडा सुरळीत चालू हाेता. माेठी मुलगी मोहिनी सातवीत, तर दाेन मुले चौथी व पाचवीत शिकत आहेत. मुलेही हुशार, चुणचुणीत आहेत.
शेतीबरोबरच पशुपालनाच्या व्यवसायाद्वारे बिरुदेवने कुटुंबाला सधनता मिळवून दिली. सध्या त्याच्याजवळ १५ जर्सी गाई आहेत. जनावरांसाठी मोठा गोठा बांधला. आधुनिक पद्धतीने पशुपालन करतो. दररोज त्याचे १८० लिटर दूध डेअरीला जाते. मोठा ट्रॅक्टर आहे. ऊसतोडीसाठी मुकदम म्हणूनही तो काम करतो. साखर कारखान्याला ऊसतोडणीच्या टोळ्या पुरवतो. भाऊ पुणे येथे उद्योगपती आहे.
मात्र दोन वर्षांपासून पती-पत्नीत बेबनाव सुरू झाला. अनैतिक संबंधाच्या संशयाचे भूत अंगात शिरले. ओळखीच्या व्यक्तीबरोबर बोलले तरीसुद्धा बिरुदेव पत्नीवर संशय घेऊ लागला. पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा त्याचा पक्का समज झाला हाेता. नातेवाइकांनी हस्तक्षेप करून अनेकदा त्यांच्यातील भांडण मिटविले. दोघांनाही समजुतीने वागण्याचा सल्ला दिला होता. पण मनात संशयाचे भूत बसलेला बिरुदेव संधीची वाट पाहत हाेता.
रविवारी त्याची आई नातेवाइकाकडे गेली होती. दुसरी मुलगी व दाेन्ही मुले हुडीबाबा जत्रेत जेवायला गेली होती. सायंकाळी अनैतिक संबंधावरून त्याचे पत्नीशी भांडण झाले. यावेळी मोठी मुलगी मोहिनी हीसुद्धा घागर घेऊन शेजारी कुपनलिकेवर पाणी आणायला गेली होती. घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन बिरुदेवने दाेरीने प्रियांकाचा गळा आवळला. याच वेळी माेहिनी पाणी घेऊन घरात आली. तिने हा प्रकार पाहून आरडाओरडा सुरू केली. तिच्या आवाजाने लोक जमा होतील. पोरगी पत्नीच्या खुनाची माहिती लाेकांना सांगेल, या भीतीने त्याने जवळच असलेली ओढणी घेऊन तिचाही गळा आवळला.
सुखी चाललेल्या संसाराची एका चुकीने कशी राखरांगोळी होते, याचे हे उदाहरणच. घटना घडून गेली. प्रियांकाबराेबर निष्पाप माेहिनीचाही बळी गेला. त्याची शिक्षा बिरुदेवला मिळेलच. पण आता त्यांच्या तीन लहान मुलांच्या संगोपनाचा, शिक्षणाचा प्रश्न उभा राहणार आहे. शिवाय वृद्धापकाळात आईचा सांभाळ काेण करणार? याचेही उत्तर नाहीच.
निष्पाप मुलीचा दोष काय?
बिरुदेव व प्रियांकाची माेठी मुलगी मोहिनी सध्या सातवीत शिकत हाेती. अनैतिक संबंधावरून पत्नीचा खून करताना आपला कारनामा लपविण्यासाठी निर्दयी बापाने तिचाही बळी घेतला. पती-पत्नीच्या भांडणात निष्पाप मुलीचा काय दाेष, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे.