सांगलीतील शेतकऱ्याचा नादच खुळा, आलिशान मोटारीतून केली भाजीविक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 01:06 PM2022-12-05T13:06:50+5:302022-12-05T13:07:26+5:30

लिलावात दर न मिळाल्याने थेट बाजारात लावली मोटार, लिलावातील दरापेक्षा चार पट दर भेटला

A farmer in Sangli sold vegetables from a luxury car | सांगलीतील शेतकऱ्याचा नादच खुळा, आलिशान मोटारीतून केली भाजीविक्री

सांगलीतील शेतकऱ्याचा नादच खुळा, आलिशान मोटारीतून केली भाजीविक्री

googlenewsNext

लक्ष्मण सरगर

आटपाडी : आटपाडीमध्ये शनिवारच्या आठवडा बाजारामध्ये एका तरुण शेतकऱ्याने आपल्या आलिशान मोटारीतून मेथीच्या भाजीची विक्री करत शेतकरी नावाच्या ‘ब्रँड’ची झलक दाखवली. चक्क आलिशान गाडीतून एक तरुण शेतकरी ओरडून मेथीची भाजी विक्री करत असल्याचे पाहून बाजारकरूंनीही भाजी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

यावेळी नागरिकांनी ‘शेतकऱ्याचा नादच खुळा’ अशा भावना व्यक्त केल्या. शेती परवडत नाही, म्हणून अनेक शेतकरी आपल्या नशिबाला दुषणे देताना दिसतात. मात्र, आपण पिकवलेला माल आपण स्वतः विकला तर त्याला हमखास दर मिळतोच. याचाच प्रत्यय आटपाडी तालुक्यातील झरे गावचे शेतकरी वामन पांडुरंग गोरड यांना आला.

शेती करत असताना शेतकऱ्याला अनेक संकटाचा सामना करावा लागतो. पीक घेत असताना असणारे हवामान, मजूर, लहरी निसर्ग याचबरोबर हवामान बदल, पिकावर रोगांचा प्रादुर्भाव, यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. यातूनही पीक व्यवस्थित आले तर सर्वात मोठा धक्का त्याला कष्ट करून पिकवलेला माल बाजारपेठेत विक्रीस नेल्यानंतर मिळालेला भाव पाहून बसतो. उत्पादन खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही.

यावर नामी शक्कल लढवत झरे येथील वामन गोरड या तरुण शेतकऱ्याने आपल्या आलिशान गाडीतूनच भाजी विकण्याचा निर्णय घेतला. आपल्या शेतामध्ये लावलेली मेथीची भाजी लिलावामध्ये नेण्यासाठी लागणारे वाहन भाडे, तसेच लिलावात मिळणारा दर पाहून ते त्रस्त झाले होते. याला पर्याय शोधत त्यांनी थेट स्वमालकीची आलिशान मोटार भाजीच्या पेंड्या भरून शनिवारी आटपाडीच्या आठवडा बाजारात आणली. आटपाडी नगरपंचायतीसमोर मोटार उभी करून मोठ्याने ओरडून भाजी विक्री केली.

यातून त्यांना प्रत्येक पेंडीमागे लिलावातील दरापेक्षा चार पट दर भेटला. दरम्यान, आटपाडीच्या बाजारपेठेत प्रथमच अशा प्रकारे आलिशान मोटारीतून भाजी विक्री होत असल्याचे पाहून बाजारकरूंमध्येही कुतूहल निर्माण झाले होते.

 

शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पिकवलेला शेतीमाल लिलावामध्ये विक्री न करता तो थेट ग्राहकास विक्री केल्यास शेतकऱ्यांना तीन ते चारपट दर मिळतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी न लाजता थेट विक्री करावी. - वामन गोरड, शेतकरी, रा. झरे, ता. आटपाडी

Web Title: A farmer in Sangli sold vegetables from a luxury car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.