Sangli: शेतकरी मालामाल! तीस गुंठे टोमॅटोतून मिळाले दहा लाख!, टाकळी-बोलवाडमधील शेतकऱ्यांची यशोगाथा
By श्रीनिवास नागे | Published: July 19, 2023 05:49 PM2023-07-19T17:49:26+5:302023-07-19T18:20:44+5:30
गतवर्षी एका टनाचे मिळाले केवळ ११ रुपये!
टाकळी : मिरज तालुक्यातील टाकळीतील प्रीतम पाटील व बोलवाड येथील दीपक पाटील या प्रगतशील शेतकऱ्यांनी ३० गुंठ्यांमध्ये १५ टन टोमॅटो उत्पादनातून दहा लाखाचे उत्पन्न घेतले. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत हिकमतीने पिकवलेल्या टाेमॅटाेला विक्रमी भाव मिळाल्यामुळे यंदाचा हंगाम साधला आहे.
द्राक्षबागांसह पालेभाज्यांची शेती अनियमित वातावरणामुळे तोट्यात आहे. अनेक वेळेस पिकांच्या उत्पादनाचे खर्चही निघत नाही. डोक्यावर कर्जाचा डोंगर निर्माण होताे. ज्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते, तोच उपाशी राहतो. मात्र, यंदा टोमॅटोने शेतकऱ्यांना तारले आहे. टाकळी येथील प्रीतम पाटील व बोलवाड येथील दीपक पाटील हे दोन तरुण शेतकरी गेल्या पाच वर्षापासून टोमॅटोचे उत्पादन घेतात. अनेकदा तोटाही सहन करावा लागला. मात्र, त्यांनी हार मानली नाही.
तीस गुंठ्यात अथर्व जातीच्या टोमॅटोच्या रोपांची मार्चमध्ये लागण केली. त्याची पहिली तोडणी ९० दिवसांनंतर सुरू झाली. २० रुपयांपासून ९० रुपयांपर्यंत दर मिळाला. दोन महिन्यापासून सुमारे १५ टन टोमॅटो कोल्हापूर, वडगाव, बेळगाव, आंध्र प्रदेशातील बाजारात गेले. पुढील काही दिवसात आणखी पाच टन टोमॅटो होतील. यातून दहा लाखाचे उत्पन्न मिळणार आहे.
गतवर्षी एका टनाचे मिळाले केवळ ११ रुपये!
गतवर्षी प्रीतम व दीपक यांनी टोमॅटोचे उत्पादन घेतले होते. मोठा तोटा सहन करावा लागला. गतवर्षी डिसेंबरमध्ये व्यापाऱ्याला दिलेल्या एक टन टोमॅटोची पट्टी केवळ ११ रुपये मिळाली होती!