Sangli- भरधाव कारची समोरुन दुचाकीला धडक, दुचाकीवरील पिता-पुत्राचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 12:10 PM2023-04-05T12:10:53+5:302023-04-05T12:10:53+5:30
अपघातानंतर माेटारीत असलेल्या चालक व अन्य दाेघा-तिघांनी घटनास्थळावरून पलायन केले
रेठरे धरण : रेठरे धरण (ता. वाळवा) येथे शिराळा रस्त्यावर भरधाव माेटारीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तडवळे (ता. शिराळा) येथील तुषार भानुदास शेवडे (वय २७) व भानुदास गुंडा शेवडे (५५) हे पिता-पुत्र जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवार, दि. ०४ मार्च राेजी रात्री १० वाजता रेठरे धरण तलावाजवळील पोपट उगळे यांच्या घरासमोर घडला.
याबाबत अधिक माहिती अशी, तडवळे येथील तुषार शेवडे व भानुदास शेवडे हे पिता-पुत्र तुजारपूर (ता. वाळवा) येथे यात्रेनिमित्ताने नातेवाईकांकडे जेवायला गेले होते. यात्रा करून रात्री दाेघेही दुचाकीवरून (क्र. एमएच १० व्ही ९५७६) गावाकडे परतत हाेते. रेठरे धरण येथील तलावाजवळच्या उतारावर शिराळ्याहून इस्लामपूरच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या माेटारीने (क्र. एमएच ५० यु ०६९३) त्यांना समाेरून जोरदार धडक दिली.
अपघातात दुचाकीवरील तुषार व भानुदास शेवडे हे बाप-लेक सुमारे २० ते ३० फूट अंतरावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात उडून पडले. दाेघांच्याही डोक्यास व हाता-पायास गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर माेटारीत असलेल्या चालक व अन्य दाेघा-तिघांनी घटनास्थळावरून पलायन केले. ते नशेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींंनी दिली. अपघाताची माहिती मिळताच मृत तुषार व भानुदास शेवडे यांचे नातेवाईक घटनास्थळी धावले. घटनास्थळी रेठरे धरण व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.