घाटात बस चढत नसल्याने निम्मे प्रवासी उतरले अन् गाडीने घेतला पेट; कऱ्हाड-शेडगेवाडी राज्यमार्गावरील घटना

By श्रीनिवास नागे | Published: June 1, 2023 01:47 PM2023-06-01T13:47:04+5:302023-06-01T13:47:23+5:30

उर्वरित प्रवासीही लगेच उतरल्याने अनर्थ टळला

A fire broke out on the Karhad Shedgewadi highway | घाटात बस चढत नसल्याने निम्मे प्रवासी उतरले अन् गाडीने घेतला पेट; कऱ्हाड-शेडगेवाडी राज्यमार्गावरील घटना

घाटात बस चढत नसल्याने निम्मे प्रवासी उतरले अन् गाडीने घेतला पेट; कऱ्हाड-शेडगेवाडी राज्यमार्गावरील घटना

googlenewsNext

कोकरुड : घाटात बस चढत नसल्याने आरामबसमधील निम्मे प्रवासी खाली उतरले आणि शंभर मीटरवर जाऊन गाडीने पेट घेतला. उर्वरित प्रवासीही लगेच उतरल्याने अनर्थ टळला. यात प्रवाशांच्या लाखोंच्या रोकडसह आरामबसचे अंदाजे पन्नास लाखाचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास कऱ्हाड-शेडगेवाडी राज्यमार्गावरील मांगिरी खिंडीत घडली.  

रत्नागिरी येथे चायनीज पदार्थांचे गाडे, हॉटेलवरील कामगार, वेटर, स्वयंपाकी, बागायतीतील मजूर, गुरखा, कपडे विक्री, तबेला कामगार यासह विविध कामांसाठी आलेले ५९ नेपाळी महिला-पुरुष हातखंबा (जि. रत्नागिरी) येथून खासगी आरामबसने (एमपी ४१ एमएम २७२७) पुण्याच्या दिशेने निघाले होते. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास आरामबस शिराळा तालुक्यातील कऱ्हाड-शेडगेवाडी राज्यमार्गावरील मांगिरी खिंडीत आली असता ती पुढे चढत नसल्याने बसमधील निम्मे प्रवासी खाली उतरले. शंभर मीटर पुढे घाट चढून गेल्यानंतर बसने अचानक पेट घेतला. 

बसमधील उर्वरित लोक आग लागल्याने खाली उतरून आरडाओरडा करू लागले. आग आटोक्यात आणण्यासाठी काहीच साधने नव्हती. त्यामुळे बसमधील प्रवाशांच्या रोख रकमेसह सर्व साहित्य, कपडे, आंबे जळून खाक झाले. कऱ्हाड नगरपालिकेस कळविल्यानंतर पहाटे सव्वापाच वाजता अग्निशमक दलाची गाडी आली, मात्र तत्पूर्वी बसमधील सर्व साहित्य आणि रोख रकमा जळून खाक झाल्या होत्या.  

मोठ्या रकमा जळून खाक

रत्नागिरीहून सुटलेल्या आरामबसला आग लागल्याचे समजताच नेपाळी कामगारांचे रत्नागिरी येथील मालक घटनास्थळी हजर झाले. मात्र प्रसारमाध्यमांना बातमी देऊ नका. प्रत्येकाच्या मोठ्या रकमा जळून खाक झाल्याने भरपाई मिळणार नाही, असे सांगत होते. बसमधील लोकांना कोणासोबत बोलण्यास मनाई करत होते. 

भाऊच्या ढाब्याचा आधार

घाट संपल्यानंतर सावंतवाडी (ता. शिराळा) येथील वसंत सावंत यांचा ‘भाऊचा ढाबा’ नावाचा ढाबा आहे. जळीत बसशेजारी थांबलेल्या सर्व प्रवाशांसाठी त्यांनी चहा-पाणी, नाष्ट्याची सोय करत आधार दिला.

Web Title: A fire broke out on the Karhad Shedgewadi highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.