आटपाडीच्या ओढ्याला आला पाचशेच्या नोटांचा पूर, नोटांसाठी नागरिकांची झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 12:36 PM2024-10-20T12:36:30+5:302024-10-20T12:38:05+5:30
लाखो रुपये नागरिकांना सापडले: नव्याबरोबर जुन्याही नोटा; पोलिसांच्या हाती लागले केवळ दहा हजार रुपये, अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, आटपाडी (जि.सांगली): चक्क ओढ्याच्या पाण्यामध्ये हजार, पाचशे, पन्नास, वीस, दहा रुपयांच्या नोटा वाहत आल्याचा प्रकार आटपाडी शहरातील शुक ओढ्यात अंबाबाई मंदिर परिसरामध्ये शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास निदर्शनास आला. पैसे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. मात्र, हे पैसे कुठून आले, याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळाली नाही. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी येऊन सुमारे दहा हजार रुपयांच्या नोटा जप्त केल्या. अज्ञाताविरुद्ध गुन्हाही दाखल केला.
शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास काही विद्यार्थी ये-जा करत असताना गदिमा पार्ककडे जाणाऱ्या छोट्या पुलाशेजारील ओढ्यामध्ये पाचशेच्या नोटा दिसल्या. त्यांनी पाण्यात जाऊन पाहिले असता पाचशेच्या अनेक नोटा दिसल्या. दरम्यान, शनिवारी येथील रस्त्यावर बाजार भरत असल्याने विक्रेते व नागरिक मोठ्या प्रमाणात जमले होते. अनेकांनी ओढ्याच्या पाण्यात जाऊन शोधमोहीम घेतली असता त्यांना पाचशेच्या अनेक नोटा सापडल्या.
प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पैसे?
दरम्यान, हे पैसे कोठून येत आहेत, याबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही. एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पैसे असल्याची चर्चा यावेळी नागरिकांमध्ये होती. यामध्ये काही जुन्या व नवीन नोटा सापडल्याने मोठी खळबळ माजली होती.
पोलिसांनी जप्त केल्या नोटा
- ओढ्यामध्ये जुन्या व नवीन बँक नोटा वाहत असल्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर आटपाडी पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस अधिकारी व अंमलदार घटनास्थळी तत्काळ दाखल झाले.
- घटनास्थळावरून जुन्या पाचशे रुपयांच्या १४ नोटा, हजार रुपयांची १ नोट असे आठ हजार रुपये व नवीन पाचशे रुपयांच्या ४, पन्नास रुपयांच्या ३, दहा रुपयांच्या ११, पाच रुपयांच्या २ आणि २० रुपयांची एक अशा एकूण १० हजार २९० रुपयांच्या नोटा पोलिसांनी जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती विभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील यांनी दिली.