संतापजनक! बलगवडेत चार महिन्यांच्या बाळाला बेवारस फेकले, तासगाव पोलिसांत नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 01:22 PM2022-03-28T13:22:07+5:302022-03-28T13:22:29+5:30
रस्ताच्या कडेला बेवारस टाकून दिलेले स्त्री जातीचे चार महिन्यांचे बाळ सापडले. ग्रामस्थांनी तात्काळ हे बाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन प्रथम उपचार करून तासगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.
तासगाव : बलगवडे (ता. तासगाव) येथे वायफळे रस्त्यालगत पहाटे ६ च्या दरम्यान गावातील लोकं व्यायामाला जात असताना रस्ताच्या कडेला बेवारस टाकून दिलेले स्त्री जातीचे चार महिन्यांचे बाळ सापडले. ग्रामस्थांनी तात्काळ हे बाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन प्रथम उपचार करून तासगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. तासगाव पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील उपचारासाठी बाळास सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बलगवडे ते वायफळे रस्त्यालगत गावाबाहेर रस्ताच्या कडेला हे बाळ दाट झाडीत फेकून दिलेले ग्रामस्थांना आढळले. बाळाच्या तोंडाला छोटीशी जखम झाली होती. बाळाच्या कपड्याला धूळ, कुसळे व काटे लागले होते. बाळ थंडीने कुडकडत जोरजोरात रडत होते. सकाळच्या सुमारास व्यायामासाठी गेलेल्या लोकांच्या लक्षात ही गोष्ट आली. सामाजिक कार्यकर्ते अरविंद पाटील, राजेंद्र रास्ते, सूरज शिंदे यांनी तातडीने त्याला गावातील उपकेंद्रात नेले. आरोग्य कर्मचारी शुभांगी मोहिते आणि हेमलता जगताप यांनी प्रथमोपचार केले.
यानंतर माजी पोलीस पाटील रघुनाथ पाटील, सरपंच जयश्री पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरविंद पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यास याबाबत माहिती दिली. तासगाव पोलीस घटनास्थळी पंचनामा केला. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बाळाला पुढील उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.