Sangli: शिराळ्यात काचेच्या तुकड्यांपासून बनविली गणेशमूर्ती, नक्षीकाम ठरतेय लक्षवेधी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 02:04 PM2024-09-07T14:04:28+5:302024-09-07T14:05:18+5:30
मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली
शिराळा : शिराळा येथे खोट्या हिऱ्यामधील, तसेच काचेच्या तुकड्यांनी बनविलेल्या श्री गणेश मूर्ती नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. दोन फूट उंचीची ही मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.
चिखलवाडी (ता. शिराळा ) येथील सतीश पवार यांचा व्यवसाय टेलरिंगचा, यामध्ये प्रामुख्याने विविध झेंडे तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. ते त्यांचा भाचा अनिल खवरे मुंबईमध्ये असताना त्यांनी तेथील एका गणपती मूर्तीवर हिऱ्यांनी केलेले काम पाहिले, त्यावेळी त्यांनी हे काम शिकले. यानंतर ते शिराळा येथे आले व टेलरिंग व्यवसाय सुरू केला. मुख्य त्यांनी विविध झेंडे बनविण्याचे काम सुरू केले. त्यांनी कोल्हापूरहून कच्च्या श्री गणपतीच्या मूर्ती आणण्यास सुरुवात केली. मुंबईहून कोठे हिरे, खडे, आदी आणून या मूर्तींवर त्यांनी नक्षीकाम केले.
सुरुवातीला मूर्ती या नक्षीकामामुळे महाग पडत होत्या. मात्र, त्यांनी आपला छंद जोपासत या व्यवसायाला चालना दिली. यामुळे नागरिकांना या खडे, खोटे हिरे, आदींनी नक्षीकाम केलेल्या मूर्ती आवडू लागल्या. त्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढला. यावर्षी त्यांनी तीन प्रकारच्या काचांच्या तुकड्यांपासून दोन फूट उंचीची आकर्षक गणपतीची मूर्ती बनविली आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. या मूर्तीवर काचेचे नक्षीकाम करण्यासाठी बारा दिवस लागले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर खोटे हिरे, रंगीबेरंगी खडे, मणी अशा विविध प्रकारच्या साहित्याने केलेले गणपती मूर्तीवरील नक्षीकाम मूर्तींना वेगळे देखणेपण आणते.
मुंबईमध्ये असताना गणपती मूर्तीवर केलेले खोट्या हिऱ्यातील काम पाहून ते आम्ही शिकलो. गणपती उत्सव झाल्यावर राख्या, आदींमधील खोटे खडे आम्ही गोळा करतो त्याचे विविध आकाराचे पॅचवर्क बनवितो. यावर्षी काचेच्या तीन प्रकारच्या तुकड्यांपासून मूर्तीवर नक्षीकाम केले आहे. - सतीश पवार, चिखलवाडी,