सांगलीत गांजा तस्करीप्रकरणी चौघांची टोळी जेरबंद
By शीतल पाटील | Published: February 22, 2023 08:36 PM2023-02-22T20:36:24+5:302023-02-22T20:36:35+5:30
स्थानिक गुन्हेची कारवाई : वीस लाखांचा गांजा जप्त
सांगली : गांजाची तस्करी करणाऱ्या चारजणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कवठेपिरान परिसरातील एका शेतात जेरबंद केले. त्यांच्याकडून विक्रीसाठी आणलेला २० लाख ४० हजार रुपयांचा १०२ किलो गांजा जप्त केला. अदिल नासीर शहापुरे (वय ३३, बाबर गल्ली, कोल्हापूर रस्ता, सांगली), सचिन बाबासाहेब चव्हाण (३१, रा. जि. प. शाळेजवळ कवठेपिरान, ता. मिरज), मयुर सुभाष कोळी (३३ रा. शंभर फुटी रस्ता, सांगली) आणि मतीन रफिक पठाण (३१, रा. काटकर गिरणीसमोर, राधाकृष्ण वसाहत सांगली) अशी अटक केलेल्या तस्कराची नावे आहेत. त्यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गांजाची तस्करी रोखण्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे. पथकातील कर्मचारी आर्यन देशिंगकर यांना कवठेपिरान ते सर्वोदय साखर कारखाना या रस्त्यावरील बाबासो चव्हाण यांच्या शेतामध्ये काहीजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने घटनास्थळी बुधवारी सापळा लावला होता. काही वेळात परिसरात दोन वाहने थांबल्याचे निदर्शनास आले. त्यामधील चौघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी दोन्ही वाहने आणि चौघांची झडती घेतली असता वाहनांमध्ये विक्रीसाठी आणलेला २० लाख ४० हजाराचा वाळलेला गांजा आढळला. चौघांनाही ताब्यात घेवून त्यांच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी गांजासह ८ लाख ५० हजार रुपये किंमतीची दोन चारचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर, पोलीस कर्मचारी जितेंद्र जाधव, राजू शिरोळकर, अमोल ऐदाळे, राहुल जाधव, संकेत मगदूम, प्रविण शिंदे, गौतम कांबळे, मच्छींद्र बर्डे आदींनी सहभाग घेतला.