सांगलीतील रेकॉर्डवरील गुंडाची सावर्डेजवळ आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 12:05 PM2024-06-22T12:05:19+5:302024-06-22T12:05:42+5:30

खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल; गुंड म्हमद्या नदाफचा साथीदार

A gangster on record in Sangli commits suicide near Sawarde | सांगलीतील रेकॉर्डवरील गुंडाची सावर्डेजवळ आत्महत्या

सांगलीतील रेकॉर्डवरील गुंडाची सावर्डेजवळ आत्महत्या

पेठवडगाव/ सांगली : खून, खुनी हल्ला, खंडणी, मारामारीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुंड सागर चंद्रकांत शेंडगे (वय ३३, रा. साई मंदिरजवळ, अभयनगर, सांगली) याने सावर्डे (ता. हातकणंगले) हद्दीतील डोंगरात निर्जनस्थळी विष पिऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

मृत सागर हा सांगलीतील कुप्रसिद्ध गुंड म्हमद्या ऊर्फ महंमद नदाफ याचा साथीदार म्हणून परिचित होता. सांगलीतील संजयनगर येथे नुकतेच उद्योजकाकडून १२ लाखांची खंडणी उकळल्याच्या प्रकरणात सागरचे नाव निष्पन्न झाले होते. त्याचा शोध सुरू असतानाच त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हातकणंगले तालुक्यातील सावर्डे-नरंदे रस्त्यावर पुलाजवळ डोंगराकडे जाणारा रस्ता आहे. गुरुवारी या रस्त्याने काही मेंढपाळ मेंढ्या चरण्यासाठी गेले होते. सायंकाळी झुडपातून दुर्गंधी येत असल्यामुळे त्यांनी पाहणी केली तेव्हा साधारण ३५ वयाच्या तरुणाचा सडलेला मृतदेह दिसला. त्यांनी पेठवडगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तेव्हा मृतदेहाजवळ शेतात पिकांवर फवारणीसाठीचे औषध मिळाले. तसेच दुचाकी (एमएच१० ईसी ३४४०) मिळून आली. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. शुक्रवारी नातेवाईकांशी संपर्क साधून मृतदेहांची ओळख पटवली. मृताचे नाव सागर शेंडगे असल्याचे स्पष्ट झाले. तो जवळपास १५ दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समजले.

मृत सागर शेंडगे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गुंड म्हमद्याबरोबर त्याने काही वर्षांपूर्वी मनोज माने याचा खून केला होता. याप्रकरणात म्हमद्याच्या टोळीला मोक्का लावण्यात आला होता. गेली काही वर्षे टोळी कारागृहातच होती. जानेवारी महिन्यात म्हमद्या जामिनावर मुक्त झाला. त्याबरोबर सागरही जामिनावर सुटला होता. परंतु त्याच्या गुन्हेगारी कारवाया थांबल्या नव्हत्या. संजयनगरमधील उद्योजकाकडून १२ लाखांची खंडणी उकळली होती. त्यानंतर तो पसार होता. त्याने आत्महत्या केल्याचे समजताच आश्चर्य व्यक्त होत आहे. पेठवडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र गायकवाड तपास करत आहेत.

खंडणीच्या गुन्ह्यात शोध

सांगलीतील उद्योजक अक्तरमिया शेख यांना पुण्यातील पार्टीने खुनाची सुपारी घेतल्याचे सांगून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून १२ लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार नुकतेच घडला होता. याप्रकरणी शेख यांनी यासीन इनामदार (रा. सांगली) याला संजयनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीत सागर शेंडगे याचे नाव निष्पन्न झाले. संजयनगर पोलिस त्याचा शोध घेत असतानाच शुक्रवारी त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Web Title: A gangster on record in Sangli commits suicide near Sawarde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.