फीसाठी पैसे नसल्याने सांगलीच्या मांगलेतील तरुणीची आत्महत्या, वडिलांनी पोलिसांवर केला आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 02:38 PM2022-11-09T14:38:45+5:302022-11-09T14:39:22+5:30
कारवाई करेपर्यंत मृतदेह हलवायचा नाही, असा पवित्रा मुलीच्या वडिलांनी घेतल्याने मृतदेह तब्बल आठ तास घरीच होता.
मांगले : मांगले (ता. शिराळा) येथील पायल रमेश देवकर (वय २०) या फार्मसीच्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली. शिराळा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याच्या त्रासामुळे मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप करीत कारवाई करेपर्यंत मृतदेह हलवायचा नाही, असा पवित्रा मुलीचे वडील रमेश देवकर यांनी घेतल्याने मृतदेह तब्बल आठ तास घरीच होता. अखेर पोलिसांनी जबरदस्तीने देवकर यांना ताब्यात घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. रात्री उशिरापर्यंत मृतदेहावर अंत्यविधी झाले नव्हते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रमेश देवकर यांचा मांगले बसस्थानक परिसरात अवैध व्यवसाय आहे. त्यांची मुलगी पायल कऱ्हाड येथे फार्मसी महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत हाेती. सुटीमुळे ती घरी आली हाेती. तिची फी भरण्यासाठी रमेश यांनी घरी पैसे ठेवले होते. मंगळवारी सकाळी ती कऱ्हाड येथे फी भरण्यासाठी जाणार होती.
दरम्यान, शिराळा पाेलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने रमेश यांना अवैध व्यवसायाच्या हप्त्यासाठी दमदाटी केली. अखेर पायलच्या फीसाठी ठेवलेल्या पैशापैकी काही रक्कम रमेश यांनी त्याला दिली. पायलने वडिलांकडे पैशाची विचारणा केली, त्यावेळी त्यांनी पैसे नसल्याने शिक्षण बंद करण्यास तिला बजावले. यानंतर तिने घरात ओढणीने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांना धक्का बसला.
घटनेची माहिती शिराळा पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर व पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रमेश यांची समजूत काढली. मात्र, ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. अखेर रात्री सात वाजता पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन शिराळा पोलीस ठाण्यात आणले. पायलच्या आईची समजूत काढून मृतदेह आठ तासांनी उत्तरीय तपासणीसाठी शिराळा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. संबंधित पोलिसावर कारवाई होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याचे रमेश यांनी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, पायलने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ‘माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये’ असा मजकूर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबतची फिर्याद रमेश देवकर यांनी शिराळा पोलीस ठाण्यात दिली आहे.