द्राक्ष व्यापाऱ्याचे एक कोटी रुपये लुटले, सांगलीतील तासगावात मारहाण करून रोकड लांबवली 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 02:35 PM2023-03-29T14:35:27+5:302023-03-29T14:35:49+5:30

पाळत ठेवूनच ही चोरी करण्यात आल्याचा अंदाज

A grape trader was robbed of one crore rupees, beaten up in Tasgaon in Sangli and made to take the cash | द्राक्ष व्यापाऱ्याचे एक कोटी रुपये लुटले, सांगलीतील तासगावात मारहाण करून रोकड लांबवली 

द्राक्ष व्यापाऱ्याचे एक कोटी रुपये लुटले, सांगलीतील तासगावात मारहाण करून रोकड लांबवली 

googlenewsNext

तासगाव : शहरातील सांगली रस्त्यावरील गणेश कॉलनी येथे अंधाराचा फायदा घेत द्राक्ष व्यापाऱ्याकडील तब्बल एक कोटी दहा लाख रुपये लुटण्यात आले. महेश शीतलदास केवलानी (रा. नाशिक) असे लुटण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास मोटार अडवत व्यापाऱ्यासह इतर दोघांना मारहाण करून चोरट्यांनी ही लूट केली.

तासगावातील गणेश कॉलनी येथील एका ‘रो हाऊस’मध्ये नाशिक येथील द्राक्ष व्यापारी महेश शीतलदास केवलानी भाड्याने राहण्यास आहेत. ते तासगाव शहरासह तालुक्यातील द्राक्षे गेल्या चार-पाच वर्षांपासून खरेदी करत आहेत. ही द्राक्षे ते बांगलादेश येथे पाठवतात. यावर्षीही ते द्राक्षे खरेदी करून पाठवत आहेत. याच द्राक्षांचे पैसे आणण्यासाठी ते मंगळवारी मोटारीतून चालक व दिवाणजीसोबत सांगली येथे गेले होते.

पैसे घेऊन ते गणेश कॉलनीकडे येत होते. सायंकाळी सव्वासातच्या दरम्यान गणेश कॉलनी येथील रस्त्यावर ते आले. वीज गेल्याने दिवे बंद असल्याने अंधार होता. त्याचवेळी त्यांच्या मोटारीसमोर अचानक दुचाकीवरून दोघे अज्ञात आले. त्यांनी दुचाकी आडवी लावली. मोटारीचा वेग कमी होताच परिसरात दबा धरून बसलेल्या अन्य पाच ते सातजणांनी मोटारीला घेरले.

काही समजण्याच्या आतच टोळक्यातील एकाने मोटार चालकास हत्याराचा धाक दाखवून रोखले, तर इतरांनी मागे बसलेल्या केवलानी व दिवाणजी यांना गाडीतून खाली जबरदस्तीने उतरवले. त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. याचवेळी केवलानी यांच्याजवळची पैशाची बॅग हिसकावून घेतली. ती एक कोटी दहा लाख रुपयांची रक्कम घेऊन आठ ते दहा चोरटे वेगवेगळ्या दिशेने पसार झाले. केवलानी आणि सोबतच्या दोघांनी आरडाओरडा केल्यानंतर लोक जमा झाले.

पाळत ठेवून लूट

द्राक्ष व्यापारी केवलानी सांगलीतून मोठी रक्कम घेऊन आले होते. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत हा प्रकार घडल्याने त्यांच्यावर पाळत ठेवूनच ही चोरी करण्यात आल्याचा अंदाज आहे.

Web Title: A grape trader was robbed of one crore rupees, beaten up in Tasgaon in Sangli and made to take the cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.