सांगलीत पोलिसांनी पकडलेला सव्वा कोटींचा गांजा जाळून नष्ट; ४५ गुन्ह्यात केला होता जप्त
By शरद जाधव | Published: August 5, 2023 08:28 PM2023-08-05T20:28:04+5:302023-08-05T20:28:18+5:30
सांगली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांनी कारवाई करत पकडलेला तब्बल एक कोटी २० लाख रुपये किंमतीचा गांजा जाळून नष्ट करण्यात आला.
सांगली : जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांनी कारवाई करत पकडलेला तब्बल एक कोटी २० लाख रुपये किंमतीचा गांजा जाळून नष्ट करण्यात आला. भिलवडी येथे वुड फायर बॉयलरमध्ये दिवसभरात हा गांजा नाश करण्यात आला. जिल्ह्यातील ११ पोलिस ठाण्यांकडे दाखल गुन्ह्यातील लागवड, वाहतूक, विक्री आणि सेवन करताना जप्त करण्यात आलेला गांजा अंमली पदार्थ गोदामात ठेवण्यात आला होता. १९९८ पासून २०२२ पर्यंतचा हा माल होता. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी गोदामात असलेला गांजा नष्ट करण्यासाठी न्यायालयीन स्तरावर पाठपुरावा करून याबाबतचा आदेश मिळविला होता. त्यानुसार ११ पोलिस ठाण्याकडील ४५ गुन्ह्यातील गांजा नष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी पाचपर्यंत भिलवडी येथील चितळे उद्योग समूहाच्या वुड फायर बॉयलरमध्ये हा गांजा नाश करण्यात आला. ही प्रक्रिया सुरू असताना प्रदुषण होणार नाही व आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होणार नाही याबाबत सर्व दक्षता घेण्यात आली होती. अनुचित प्रकार घडू नये म्हणून आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल, रासायनिक विश्लेषकांचे पथक, वैध मापन विभागाचे कर्मचारी, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. चितळे उद्योग समूहाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही याकामी सहकार्य केले.
पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर अधीक्षक तुषार पाटील, अरविंद बोडके, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, रासायनिक विश्लेषक वर्षा पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.
बाराशे किलो गांजा
नाश केलेला गांजा हा जिल्ह्यातील जत, उमदी, मिरज शहर पोलिस ठाणे, महात्मा गांधी चौक पोलिस ठाणे मिरज, सांगली ग्रामीण, विटा, कासेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज ग्रामीण भागातील १२०५ किलो गांजाचा समावेश आहे.