मूठभर श्रीमंत लोक जगाची अर्थव्यवस्था पोखरत आहेत, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. गणेश देवींनी व्यक्त केलं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 12:58 PM2022-12-05T12:58:47+5:302022-12-05T12:59:10+5:30
'जी. डी. बापूंनी स्त्रियांबाबत झालेल्या अत्याचाराला तोंड फोडण्यासाठी केलेल्या कार्याची पुनरावृत्ती होणे गरजेचे'
कुंडल : मूठभर श्रीमंत लोक जगाची अर्थव्यवस्था पोखरत आहेत. अशा वृत्ती राेखण्यासाठी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू यांनी सावकारांविरोधात उभा केलेला लढा पुन्हा उभारणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. गणेश देवी यांनी केले.
कुंडल (ता. पलूस) येथे रविवारी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डॉ. गणेश देवी यांना खासदार श्रीनिवास पाटील यांच्याहस्ते क्रांतिअग्रणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बाेलत हाेते. यावेळी माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, आमदार अरुण लाड प्रमुख उपस्थित होते.
गणेश देवी म्हणाले, बिल्कीस बानोवर झालेल्या अत्याचाराबाबत घडलेल्या घटना निंदनीय होत्या. अशा घटनांमध्ये जी. डी. बापूंनी स्त्रियांबाबत झालेल्या अत्याचाराला तोंड फोडण्यासाठी केलेल्या कार्याची पुनरावृत्ती होणे गरजेचे वाटते. जगात जेवढ्या क्रांती झाल्या त्या सगळ्या फसल्या, पण या भागात जी क्रांती उभी राहिली, ती फसली नाही. ती हसली, हे केवळ जी. डी. बापूंसारख्या प्रगल्भ स्वातंत्र्य सैनिकांमुळेच. या पुरस्काराच्या माध्यमातून मी बापूंची मूल्ये समाजात रुजवण्यासाठी प्रयत्न करेन.
श्रीनिवास पाटील म्हणाले, या भागाचे बापूंनी नंदनवन केले. बापूंनी स्वातंत्र्यानंतरही या भागासाठी केलेले कार्य अतुल्य आहे. त्यांचा प्रगल्भ वारसा आमदार अरुण लाड समर्थपणे चालवत आहेत.
अरुण लाड म्हणाले, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड हे कसे जगले, त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान, त्यांनी केलेला त्याग नवीन पिढीला माहिती व्हावा, म्हणून समाजात अलौकिक काम करणाऱ्या व्यक्तींना क्रांतिअग्रणी पुरस्कार देण्यात येत आहे.
प्रारंभी डॉ. जी. डी. (बापू) लाड, विजयकाकू लाड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जयवंत आवटे यांनी स्वागत केले. सर्जेराव खरात यांनी मानपत्राचे वाचन केले. गोविंद जाधव यांनी आभार मानले. श्रीकांत माने यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, उद्योजक उदय लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, ॲड. सुभाष पाटील, ॲड. सयाजीराव पाटील, सरपंच प्रमिला पुजारी, बाबुराव गुरव, मारुती शिरतोडे, श्रीकांत लाड, नंदा पाटील, पूजा लाड, सर्जेराव पवार, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, अशोक पवार, मुकुंद जोशी, व्ही. वाय. पाटील, डॉ. प्रसन्न विभूते आदी उपस्थित होते.