कामगारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय उभारणार, कामगार मंत्री सुरेश खाडेंनी दिली माहिती
By अविनाश कोळी | Published: August 29, 2022 12:55 PM2022-08-29T12:55:08+5:302022-08-29T12:57:16+5:30
कामगार ते आमदार व आमदार ते कामगार मंत्री हा प्रवास माझ्यासाठी सुखद
अविनाश कोळी
सांगली : कामगार कल्याणकारी मंडळाकडे सध्या १३ हजार कोटी रुपये उपलब्ध आहेत. यातून कामगारांसाठी स्वस्तात घरकुल योजना राबविली जाणार असून प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज कामगार रुग्णालय उभारण्याचा विचार सुरु आहे, अशी माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
‘लोकमत’च्या सांगली कार्यालयास आज, सोमवारी खाडे यांनी भेट दिली. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांनी अभिवादन केले. यावेळी ते म्हणाले की, कामगार खाते मिळाल्याने मी समाधानी आहे. या खात्याच्या माध्यमातून खूप कामे, योजना राबविल्या जाऊ शकतात. निधीचीही कमतरता नाही. कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येईल. बांधकाम कामगारांच्या नोंदणीचा विषय गांभिर्याने घेतला आहे. दोन महिन्यात प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना कामगारांच्या नोंदणीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी प्रत्यक्ष त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन नोंदणी शिबिर घेण्याची सूचना दिली आहे. नोंदणीचे काम पूर्ण होताच त्यांच्यासाठी विविध योजना हाती घेण्यात येतील.
कामगार ते कामगारमंत्री हा प्रवास सुखद
माझगाव डॉकमध्ये १३ वर्षे मी कामगार म्हणून काम केले आहे. त्यामुळे कामगारांच्या व्यस्था मला माहिती आहेत. कामगार ते आमदार व आमदार ते कामगार मंत्री हा प्रवास माझ्यासाठी सुखद अनुभव आहे, असे खाडे म्हणाले.