पत्नीने वाद घातल्याचा राग, डोक्यात बांबूने वार करुन केला खून; पतीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 02:04 PM2022-10-07T14:04:15+5:302022-10-07T14:04:39+5:30

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला रिक्षात बसवून उपचारासाठी सांगलीतील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मृत्यू झाल्याचे समजताच पतीने रुग्णालयातून पळ काढला

A husband killed his wife due to a domestic dispute at Bamanoli taluka Miraj sangli district | पत्नीने वाद घातल्याचा राग, डोक्यात बांबूने वार करुन केला खून; पतीस अटक

पत्नीने वाद घातल्याचा राग, डोक्यात बांबूने वार करुन केला खून; पतीस अटक

googlenewsNext

कुपवाड : बामणोली (ता. मिरज) येथील सुनंदा कुमार जाधव (वय ३०) या विवाहित महिलेचा घरगुती वादातून पतीने डोक्यात बांबूने जोरदार हल्ला केल्यामुळे जागीच मृत्यू झाला. पत्नी मृत झाल्याचे समजताच पतीने पलायन केले. मात्र, कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी तातडीने संशयित पतीच्या मुसक्या आवळून गजाआड केले. कुमार भीमराव जाधव (वय ३८, सध्या रा. दत्तनगर, बामणोली, ता. मिरज आणि मूळ गाव जुनोनी, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बामणोली येथील दत्तनगर भागात संशयित कुमार जाधव हा गेल्या काही वर्षांपासून पत्नी, तीन मुलींसह भाड्याच्या खोलीत राहत आहे. जाधव हा कुपवाड एमआयडीसीतील एका कारखान्यात हमाली करीत होता. त्याचा विवाह २००३ मध्ये (तावशी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील मोहन जगदाळे यांची मुलगी सुनंदा यांच्याबरोबर झाला होता. बुधवारी रात्री संशयित कुमार जाधव व पत्नी सुनंदा याच्यात घरगुती कारणावरून व तू माहेरहून पैसे आण या कारणावरून वाद झाला.

पत्नीने वाद घातल्याचा राग मनात आल्याने पती कुमार याने पत्नी सुनंदा हिला घरातून फरफटत घराबाहेर अंगणात आणून बांबूने डोक्यात जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात सुनंदा रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत पती कुमार याने शेजारील एका रिक्षाचालकाला बोलावून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला रिक्षात बसवून उपचारासाठी सांगलीतील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. यावेळी संशयित कुमार याने डाॅक्टरांना सांगितले की, पत्नी घरात फरशीवर पाय घसरून पडल्याने जखमी झाली आहे. डाॅक्टरांनी पत्नी सुनंदा हिची तपासणी केली असता, तिचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजताच पती कुमार जाधव याने रुग्णालयातून पळ काढला. डाॅक्टरांनी या घटनेची माहिती कुपवाड एमआयडीसी पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील, हवालदार गजानन जाधव, संदीप पाटील, सतीश माने, महादेव नागणे यांनी तातडीने संशयित कुमार जाधव याचा शोध घेऊन त्याला गजाआड केले.

Web Title: A husband killed his wife due to a domestic dispute at Bamanoli taluka Miraj sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.