Sangli: नांदायला येत नसल्याच्या राग, पतीने पत्नीला चाकूने भोसकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:55 IST2025-01-13T18:54:50+5:302025-01-13T18:55:18+5:30
कडेगाव : कडेगाव येथे नांदायला येत नसल्याच्या रागातून पतीने पत्नीला चाकूने भोसकल्याची गंभीर घटना घडली. वंदना अधिकराव तांबवेकर-पाटील (सध्या ...

Sangli: नांदायला येत नसल्याच्या राग, पतीने पत्नीला चाकूने भोसकले
कडेगाव : कडेगाव येथे नांदायला येत नसल्याच्या रागातून पतीने पत्नीला चाकूने भोसकल्याची गंभीर घटना घडली. वंदना अधिकराव तांबवेकर-पाटील (सध्या रा. कडेगाव) असे जखमी महिलेचे नाव आहे, तर अधिकराव पांडुरंग तांबवेकर-पाटील (वय ४८, रा. शेवाळेवाडी येवती, ता. कऱ्हाड, जि. सातारा) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत वैशाली प्रकाश पाटील (रा. कडेगाव) यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयित अधिकराव तांबवेकर-पाटील याला अटक केली आहे.
याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अधिकराव व वंदना हे दोघे पती-पत्नी आहेत. दोघामध्ये घरगुती वाद झाल्याने पत्नी वंदना या गेल्या पाच ते सहा वर्षांपासून त्यांची बहीण वैशाली पाटील यांच्याकडे राहत असलेल्या कडेगाव शहरात राहत आहेत, तर पती अधिकराव हा सातत्याने आपण परत एकत्र आपल्या गावी शेवाळेवाडी येवती येथे राहूया, अशी विनंती वंदना यांना करत होता; परंतु दोघांमध्ये यापूर्वी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीमुळे पत्नी वंदना या सासरी शेवाळेवाडी येवती येथे जात नव्हत्या.
त्यामुळे याचा राग अधिकराव याच्या मनात होता, तर संशयित अधिकराव हा आज सकाळी कडेगाव येथे पत्नी वंदना राहत असलेल्या घरी आला. त्यावेळी त्याने काही एक न बोलता पाठीमागून येऊन पत्नी वंदना यांच्या पाठीवर चाकूने मारून त्यांना खाली पाडले. त्यानंतर पोटावर ठिकठिकाणी वार करून गंभीर जखमी केले, तसेच जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
त्यामध्ये वंदना या गंभीर जखमी झाल्या. यावेळी आरडाओरडा ऐकून आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने अनर्थ टळला, तर नागरिक व नातेवाइकांनी जखमी वंदना यांना उपचारासाठी कऱ्हाड येथे कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या घटनेची कडेगाव पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव करीत आहेत.