शेतीमालाच्या तपासणीची प्रयोगशाळा सांगलीत उभारणार, १७ कोटी मंजूर

By अशोक डोंबाळे | Published: October 20, 2023 11:29 AM2023-10-20T11:29:10+5:302023-10-20T11:30:36+5:30

सोलापूर, सातारा, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना लाभ

A laboratory for inspection of agricultural produce will be set up in Sangli, 17 crores approved | शेतीमालाच्या तपासणीची प्रयोगशाळा सांगलीत उभारणार, १७ कोटी मंजूर

शेतीमालाच्या तपासणीची प्रयोगशाळा सांगलीत उभारणार, १७ कोटी मंजूर

अशोक डोंबाळे

सांगली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मालाची निर्यात करण्यासाठी कीडनाशक उर्वरित अंश तपासणीची शासनाने सक्ती केली आहे. या तपासणीसाठी यापूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास होत होता. या त्रासातून शेतकऱ्यांची आता मुक्तता होणार असून सांगलीला यासाठी राज्य शासनाने १७ कोटी रुपयांची कीटकनाशक उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळा मंजूर केली आहे. याचा लाभ सांगलीसह कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील उत्पादकांना होणार आहे.

परदेशात कीटकनाशक उर्वरित अंश विरहित शेतमालाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतीमाल पाठविण्यापूर्वी भाजीपाला, फळांमधील कीटकनाशकांची उर्वरित अंशाची तपासणी करून त्याची गुणवत्ता तपासल्यास शेतकरी व निर्यातदारांना फायदा होतो. युरोप राष्ट्रात द्राक्ष, डाळिंब पाठविण्यासाठी फळातील कीटकनाशकांचा अंश तपासणी प्रमाणपत्र सक्तीचे आहे.

यासाठी कीटकनाशक अंश तपासणीच्या शासकीय प्रयोगशाळा पुणे आणि नागपूर येथेच आहेत. याशिवाय खासगी प्रयोगशाळा आहेत. पण, तेथील तपासणी खर्चीक असल्यामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही. म्हणूनच निर्यातदार शेतकऱ्यांनी कीटकनाशक अंश तपासणी प्रयोगशाळा सांगली जिल्ह्यात करण्याची लोकप्रतिनिधींकडे मागणी केली होती.

त्यानुसार आमदार अनिल बाबर यांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती. अखेर राज्य शासनाने सांगली आणि नाशिक जिल्ह्यासाठी कीटकनाशक अंश तपासणी प्रयोगशाळा मंजूर केली आहे. प्रत्येक प्रयोगशाळेसाठी १७ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. इमारत, प्रयोगशाळा साहित्यांची खरेदी होणार आहे.

कृषीमाल निर्यातीत महाराष्ट्र अग्रेसर

महाराष्ट्रात द्राक्ष, डाळिंब, आंबा, कांदा व इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. देशाच्या एकूण निर्यातीपैकी ९८ टक्के द्राक्ष, ७६ टक्के आंबा, ४९ टक्के कांदा, २७ टक्के इतर फळे, १८ टक्के इतर भाजीपाला महाराष्ट्रातून निर्यात होतो. म्हणूनच महाराष्ट्र राज्य फलोत्पादनाच्या उत्पादन व निर्यातीत अग्रेसर राज्य आहे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अशी तपासतात मात्रा

कीटकनाशक नमुने तपासणी तीन पद्धतीने केली जाते. पहिल्या प्रकारात भाजीपाला, फळांच्या नमुन्यांचा मिक्सरमध्ये लगदा करून त्याचा १० मिलीलिटर द्रव तयार केला जातो. प्रतिमिली ग्रॅम प्रतिकिलो यानुसार नमुना तपासून पी.एफ.ए.ची मात्रा ठरविली जाते. द्रव पदार्थांच्या तपासणीसाठी देखील हाच निकष वापरून दूध आणि पाण्याच्या नमुन्यांची तपासणी होते. धान्याच्या नमुन्यासाठी देखील वेगळे निकष आहेत.

Web Title: A laboratory for inspection of agricultural produce will be set up in Sangli, 17 crores approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.