Sangli: ओव्हरटेकच्या प्रयत्नात ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने मजुराचा मृत्यू, महिला गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 11:45 AM2023-11-29T11:45:10+5:302023-11-29T11:45:28+5:30
इस्लामपूर : इस्लामपूर-कामेरी रस्त्यावरील खंडागळे मळ्याजवळ ट्रॅक्टरला ओलांडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील ऊसतोड मजूर ट्रॉलीला धडकून ठार झाला. यामध्ये ...
इस्लामपूर : इस्लामपूर-कामेरी रस्त्यावरील खंडागळे मळ्याजवळ ट्रॅक्टरला ओलांडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील ऊसतोड मजूर ट्रॉलीला धडकून ठार झाला. यामध्ये ट्रॉलीचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले, तर दुचाकीवर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात मंगळवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास घडला.
सागर संभाजी तोरणे (रा. जांभुळणी, ता. माण, जि. सातारा) असे ठार झालेल्या मजुराचे नाव आहे. तर कुसुम दादा गोरवे ही डोक्यास मार लागून गंभीर जखमी झाली. अपघाताबाबत अर्जुन सत्यवान बोरवे (वय ३९, रा. वळई, ता. माण) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मृत सागर तोरणे याच्याविरुद्ध अपघातात स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरून महिलेस गंभीर जखमी केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ऊसतोड मजुरांची टोळी कामेरी परिसरात वास्तव्यास आहे. बाबा सीताराम नामदास हा आपला ट्रॅक्टर (क्र. एमएच ११-डीएच ३०८६) आणि त्याला दोन ट्रॉली जोडून त्यातून काही ऊसतोड मजुरांना घेऊन कामेरी हद्दीतील सूर्यकांत पाटील यांच्या शेतातील ऊसतोडणीसाठी निघाला होता.
खंडागळे मळ्याजवळ सागर तोरणे हा कुसुम गोरवे यांना घेऊन दुचाकीवरून (क्र. एमएच ११-डीके १६२८) ट्रॅक्टरला ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीचा धक्का लागल्याने सागर तोरणे हा खाली पडला. यामध्ये ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. तर कुसुम गोरवे ही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.