पालकमंत्र्यांच्या वेळेअभावी संपर्क क्रांतीच्या स्वागताचा खोळंबा, प्रवासी संघटनातून संताप

By अविनाश कोळी | Published: October 6, 2024 02:53 PM2024-10-06T14:53:36+5:302024-10-06T14:54:22+5:30

सांगली, किर्लोस्करवाडीत थांबा असूनही गाडीचा संपर्क नाही...

A lack of time for the Guardian minister hampered the welcome of the sampark kranti, angered by travel associations | पालकमंत्र्यांच्या वेळेअभावी संपर्क क्रांतीच्या स्वागताचा खोळंबा, प्रवासी संघटनातून संताप

पालकमंत्र्यांच्या वेळेअभावी संपर्क क्रांतीच्या स्वागताचा खोळंबा, प्रवासी संघटनातून संताप

सांगली : प्रदीर्घ संघर्षानंतर सांगली रेल्वे स्थानकाला संपर्क क्रांतीचा तर किर्लोस्करवाडीला निजामुद्दीन एक्सप्रेसचा थांबा मंजूर झाला. मात्र, या दोन्ही गाड्यांच्या स्वागत कार्यक्रमासाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांची वेळ मिळत नसल्याने या गाड्यांचा थांबा अद्याप सुरु झालेला नाही. त्यामुळे सांगली व किर्लोस्करवाडीतील प्रवासी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.

सांगली व किर्लोस्करवाडीचा थांबा तातडीने सुरु करण्याची मागणी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली होती. त्याबाबतचे लेखी पत्रकही पाठविले होते. मात्र, प्रवासी संघटनांनी थांबा सुरु न होण्याच्या कारणांचा शोध घेतल्यानंतर गाडीच्या स्वागत सोहळ्यासाठी पालकमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे समाजमाध्यमांवर पालकमंत्र्यांबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संपर्क क्रांतचा थांबा सांगली व किर्लोस्करवाडीस मंजूर असतानाही रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी त्यांना तात्काळ पत्र पाठवावे. येणाऱ्या लोकसभा अधिवेशनात रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणावा. संपर्क क्रांतीला रेल्वेमंत्र्यांनी २५ सप्टेंबरला सांगलीस थांबा मंजूर केला. त्याचवेळी हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसला किर्लोस्करवाडीत थांबा जाहीर झाला. या गाड्यांचा औपचारिक स्वागताचा सोहळा आयोजनाच्या हालचाली सुरु होत्या. गेल्या अकरा दिवसांपासून सांगलीच्या पालकमंत्र्यांना यासाठी वेळ मिळत नसल्याने अद्याप दोन्ही स्थानकावर थांबा सुरु झालेला नाही. येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असून त्यानंतर उद्घाटन होऊ शकणार नाही. त्यामुळे सांगली जिल्ह्याला मिळालेल्या संपर्क क्रांती गाडीपासून येथील प्रवाशांना मुकावे लागणार आहे.

पालकमंत्र्यांकडून प्रतिसाद नाही -
पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संपर्क क्रांतीबाबत त्यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत त्यांची बाजू समजू शकली नाही.

रेल्वेमंत्र्यांच्या मंजुरी पत्राला ठेंगा
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी चंडीगड-यशवंतपूर संपर्क क्रांती व यशवंतपूर-चंदिगड संपर्क क्रांतीला सांगलीत थांबा मंजूर केल्याचे पत्र रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले होते. त्यांच्या आदेशालाही आता औपचारिक स्वागत सोहळ्यामुळे ठेंगा दाखविला गेला आहे.

Web Title: A lack of time for the Guardian minister hampered the welcome of the sampark kranti, angered by travel associations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.