अमावास्येला जिवंत बोकड झाडाला उलटे टांगले; कवलापूर येथे बळी देण्याचा अघोरी प्रकार

By घनशाम नवाथे | Published: April 14, 2024 05:48 PM2024-04-14T17:48:18+5:302024-04-14T17:49:54+5:30

कवलापूर ते तासगाव रस्त्यावर रस्त्यापासून पन्नास फूट अंतरावरील शेतातील एका लिंबाच्या झाडाला एक वर्ष वयाचे अंदाजे दहा किलो वजनाच्या बोकडाचे मागील दोन पाय दोरीने बांधून त्यांना उलटे टांगून ठेवले होते.

A live buck is hung upside down on a tree on the new moon; Aghori form of sacrifice at Kavalapur | अमावास्येला जिवंत बोकड झाडाला उलटे टांगले; कवलापूर येथे बळी देण्याचा अघोरी प्रकार

अमावास्येला जिवंत बोकड झाडाला उलटे टांगले; कवलापूर येथे बळी देण्याचा अघोरी प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे तासगाव रस्त्याकडेच्या एका लिंबाच्या झाडाला दर्श सोमवती अमावास्येच्या दिवशी कोणीतरी अंधश्रद्धेतून जिवंत बोकड आणून मागील दोन पाय दोरीने बांधून झाडाच्या फांदीला उलटे लटकवून ठेवले होते. आठवडाभर बोकड त्याच अवस्थेत राहिल्यामुळे तडफडून त्यांचा मृत्यू झाला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हा प्रकार कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अंनिसने सांगली ग्रामीण पोलिसांना हा प्रकार कळवला. या अघोरी बळीची गावात चर्चा रंगली आहे.

कवलापूर ते तासगाव रस्त्यावर रस्त्यापासून पन्नास फूट अंतरावरील शेतातील एका लिंबाच्या झाडाला एक वर्ष वयाचे अंदाजे दहा किलो वजनाच्या बोकडाचे मागील दोन पाय दोरीने बांधून त्यांना उलटे टांगून ठेवले होते. अमावास्येला रात्री बांधलेले बोकड आठवडाभर तसेच राहिल्यामुळे त्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे. जागरूक नागरिक शिवाजीराव पाटील यांनी अंनिसला हा प्रकार कळवला. तातडीने अंनिसचे कार्यकर्ते डॉ. संजय निटवे, राहुल थोरात, फारुख गवंडी यांनी पाहणी केली.

हा सर्व प्रकार अमावास्येच्या रात्री ज्याप्रकारे केला आहे, यामागे अघोरी प्रथा आणि अंधश्रद्धेचा प्रकार दिसून येतो. आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की, पाडव्याच्या आदल्या दिवशी अमावास्येच्या रात्री एक गाडी रस्त्याकडेला येऊन थांबली होती. त्यातील लोकांनी हा प्रकार केला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
झाडाला जिवंत बोकड उलटे टांगून बळी देण्याचा अघोरी प्रकार पहिल्यांदाच पाहात असल्याचे अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात, फारूक गवंडी यांनी यावेळी सांगितले. मांत्रिकाच्या किंवा देवरुर्षीच्या सल्ल्यानुसार कोणी तरी अमावास्येच्या दिवशी हा प्रकार केला असावा, असे वाटते. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यास हा प्रकार कळवण्यात आला.

जिवंत बोकडाचा अघोरी बळी देणे, ही अत्यंत अमानवी, अघोरी प्रथा आहे. संबंधितांचा शोध घेऊन जादूटोणाविरोधी कायद्यानुसार आणि प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी थोरात, गवंडी, डॉ. निटवे यांनी केली आहे. तसेच याबाबत कोणाला माहिती असल्यास पोलिसांशी किंवा अंनिसशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

परिसरात दुसऱ्यांदा प्रकार
यापूर्वीही कवलापूर येथील रसूलवाडी रस्त्यावरही अशा प्रकारे झाडाला बोकड उलटे टांगून अघोरी प्रकाराने बळी देण्याचा प्रकार घडल्याची माहिती नागरिकांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांना दिली.

Web Title: A live buck is hung upside down on a tree on the new moon; Aghori form of sacrifice at Kavalapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.