वरातीत झाडल्या रिव्हॉल्व्हरच्या फैरी, तरुणाच्या दंडात घुसली गोळी; सांगलीतील भाटशिरगाव येथील प्रकार
By श्रीनिवास नागे | Updated: June 29, 2023 17:53 IST2023-06-29T17:51:02+5:302023-06-29T17:53:10+5:30
अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला

वरातीत झाडल्या रिव्हॉल्व्हरच्या फैरी, तरुणाच्या दंडात घुसली गोळी; सांगलीतील भाटशिरगाव येथील प्रकार
शिराळा : भाटशिरगाव (ता. शिराळा) येथे लग्नाच्या वरातीत नाचत एकाने रिव्हॉल्व्हरने हवेत गोळीबार केला, मात्र अचानक गोळी सुटून समोर थांबलेल्या तरुणाच्या दंडातून आरपार गेली. यात तो गंभीर जखमी झाला. हृतिक दिलीप इंगळे (वय २३, रा. भाटशिरगाव) असे जखमीचे नाव आहे. काल, बुधवार, (दि. २८) हा प्रकार घडला.
याप्रकरणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील सेवानिवृत्त जवान संजय सखाराम देसाई (वय ५२) आणि गोळीबार करणाऱ्या ओमकार भगवान देसाई (२५, दोघे रा. भाटशिरगाव) या दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना दि. १ जुलैअखेर पोलिस कोठडी सुनावली.
बुधवारी भाटशिरगाव येथील देसाईवस्तीत अवधूत देसाई यांचे लग्न होते. रात्री लग्नाची वरात निघाली. वरात पाहण्यासाठी भाऊ अजय इंगळे व सनी गायकवाड यांच्याबरोबर जखमी हृतिक आला होता. त्यावेळी नाचताना ओमकार देसाई याने केंद्रीय राखीव पोलीस दलातील सेवानिवृत्त जवान संजय देसाई यांच्या कमरेचे रिव्हॉल्व्हर घेत हवेत गोळी उडवली. दुसरी गोळी उडवताना ती सुटून अचानक समोर थांबलेल्या हृतिक इंगळेच्या दंडात लागली. यात तो गंभीर जखमी झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला.
जखमी हृतिकला तातडीने उपचारासाठी शिराळ्यात उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत हृतिकने शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, हवालदार महेश गायकवाड पुढील तपास करीत आहेत.