अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी एकास आठ वर्षांची शिक्षा, जिल्हा न्यायालयाचा निकाल
By शरद जाधव | Published: October 11, 2022 07:01 PM2022-10-11T19:01:41+5:302022-10-11T19:02:23+5:30
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी एकास आठ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
सांगली : मिरज शहरातील एका उपनगरात विवाहित असूनही अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकास आठ वर्षे सक्तमजुरीची न्यायालयाने शिक्षा सुनावली. शिवाजी बसवण्णा इंगवले (वय २३, रा. दुर्गानगर, एमआयडीसी, मिरज), असे आरोपीचे नाव आहे. विशेष जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील रियाज जमादार यांनी काम पाहिले. माहितीनुसार, मिरज शहरातील एका उपनगरात पीडिता राहत होती. आरोपी शिवाजी इंगवले याचा रिक्षा व्यवसाय आहे. तो विवाहित असून त्याची पत्नी घरी असतानाही त्याने हे कृत्य केले. पीडिता घराबाहेर गेली असता, आरोपीने त्याच्या मित्राच्या साहाय्याने जबरदस्तीने तिला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या रिक्षात बसविले व दंगा केलास तर तुझ्या भावाला ठार मारेन, अशी धमकी दिली. त्यामुळे ती आरडाओरडा करू शकली नाही. पीडित मुलीला रिक्षातून जोतिबाला घेऊन जात तेथून कागल, जि. कोल्हापूर येथे एका खोलीत नेऊन ठेवले व तिला धमकी देत तिच्यावर अत्याचार केला.
दुसऱ्या दिवशी आरोपीची रिक्षा त्याचा मित्र घेऊन येत असताना दिसला. त्याला पीडितेचा भाऊ व इतरांनी पकडून आरोपी कुठे आहे असे विचारले असता, त्याने कागल येथील खोली दाखवली. त्याठिकाणी पीडितेचा भाऊ गेला असता, आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता, तेवढ्यात त्यास पकडून कुपवाड एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात त्यास देण्यात आले. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर दहा साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडिता, तिचे वडील, डॉ. विकास देवकाते, डॉ. वीणा गवळी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ए. ए. भवड व उपनिरीक्षक के. एम. गायकवाड यांनी केला. या खटल्यात अशोक कोळी, पैरवी कक्षातील वंदना मिसाळ यांचे सहकार्य लाभले.