प्रेमविवाह केलेल्या विवाहितेची सांगलीत पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

By शरद जाधव | Published: November 29, 2022 09:04 PM2022-11-29T21:04:15+5:302022-11-29T21:04:22+5:30

नाशिक येथील संशयित पतीवर गुन्हा दाखल

A married woman commits suicide after suffering from her husband in Sangli | प्रेमविवाह केलेल्या विवाहितेची सांगलीत पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

प्रेमविवाह केलेल्या विवाहितेची सांगलीत पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

Next

सांगली : प्रेमविवाह केलेल्या विवाहितेने पतीच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन शहरातील गव्हर्न्मेंट कॉलनी परिसरात आत्महत्या केली. प्रियांका गोपाल आहिरे (वय २५, मूळ रा. निफाड, जि. नाशिक, सध्या हसनी आश्रमाजवळ, सांगली) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी मृत प्रियांकाचे वडील भीमा दादा झोटिंग (रा. निफाड, जि. नाशिक) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. झोटींग यांच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी प्रियांकाचा पती गोपाल प्रकाश आहिरे (रा. खेरवाडी, ता. निफाड, जि. नाशिक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळ निफाड येथील प्रियांका सांगली शहरातील एका विमा कंपनीत कामास होत्या. याच कंपनीत संशयित गोपाल आहिरे काम करत होता. प्रियांका यांची त्याच्याशी ओळख झाली. यातून दोघांनी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर प्रियांका व गोपाल आहिरे असे दोघेजण हसनी आश्रम जवळील अपार्टमेंटमध्ये राहण्यास होते. सप्टेंबरमध्ये प्रियांकाचा मामेभाऊ कुणाल पटाडे दोघांच्या घरी गेला होता. काही दिवस तो राहून गेल्यानंतर प्रियांकाला गोपाल शारीरीक व मानसिक त्रास देत आहे, असे झोटींग यांना सांगितले होते.

सोमवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी रात्री विश्रामबाग पोलिसांनी फिर्यादी झोटिंग यांच्याशी संपर्क साधून सांगितले की, प्रियांकाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. झोटिंग यांनी सांगलीमध्ये येऊन प्रियांकाचा अंत्यविधी करत तिचा पती गोपाल आहिरे याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A married woman commits suicide after suffering from her husband in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.